डोंबिवली: येथील पश्चिम भागात घरकाम करणाऱ्या एका गृहसेविकेने घर मालकीणीला अंधारात ठेऊन तिच्या अपरोक्ष येऊन घरातील तीन लाख रूपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही, तांत्रिक माहितीच्या आधारे घरकाम करणाऱ्या गृहसेविकेने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न करून तिला शनिवारी अटक केली.
घरातील खिडक्या, दरवाजे सुस्थितीत असताना दागिने चोरी झालेच कसे, असा प्रश्न मालकीणीच्या तक्रारीनंतर पोलिसांना पडला होता. पश्चिमेतील खेती वाडी रस्त्यावर आस्था पाटील एका सोसायटीत राहतात. त्या कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्यांच्या घरातील कपाटाच्या तिजोरीतील दोन लाख ९७ हजार रूपयांचे १० तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.
हेही वाचा… डोंबिवलीत कोयता घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुंडाला अटक; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
घरी परतल्यावर आस्था पाटील यांना घराचे दरवाजे, खिडक्यांची मोडतोड झालेली नाही. तरी घरातील दागिने चोरीला गेलेच कसे, असा प्रश्न पडला होता. त्यांनी घरकाम करणाऱ्या गृहसेविकेवर संशय व्यक्त करून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गंगुबाई उर्फ गिता लक्ष्मण दळवी या मोठागाव मध्ये राहणाऱ्या गृहसेविके विरूध्द तक्रार केली होती.
कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. आस्था यांच्या घर परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासल्यावर गुन्हे शाखेचे हवालदार गुरूनाथ जरग, विश्वास माने यांना आस्था यांच्या घराच्या संरक्षित भिंतीवरून एक महिला त्यांच्या घरात आल्याचे दिसले. पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या महिलेची माहिती जमा केली. आस्था यांना हे चित्रण दाखवले. त्यांनी ही महिला आपल्या घरात नेहमी येणारी गंगुबाई असल्याचे सांगितले. पोलिसांनी गंगुबाईला चौकशीसाठी बोलावले. त्यांनी चोरीचा आरोप मान्य करण्यास नकार दिला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर गंगुबाईने आस्था यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुंंगबाईला अटक केली आहे.