ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात गिर्यारोहणासाठी गेलेल्या परंतु मधमाशांच्या हल्ल्यामुळे जंगलात अडकलेल्या १० तरुणांची पोलीस आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुटका केली. यातील तीन तरुणांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाणे, कळवा, मुंबई आणि नवी मुंबई भागात राहाणारे १८ वर्षीय मुले सोमवारी दुपारी गिर्यारोहणासाठी येऊरच्या जंगलात गेले होते. सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ते जंगलामध्ये एका डोंगरावर गेले असता, त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने तेथेच लपून बसले. स्थानिकांनी या मुलांना पाहिल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वर्तकनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. पथकांनी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्यांची सुटका केली. मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर तीन मुलांना मधमाशांनी चेहऱ्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.