ठाणे – शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारी पासून सुरुवात झाली. आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या आठवड्याभरात ठाणे जिल्ह्यातून १० हजार ५०६ अर्ज प्राप्त झाले आहेत. ११ हजार ३२० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. पालकांना २७ जानेवारीपर्यंत आरटीईच्या संकेतस्थळावर आपल्या बालकाची नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजातील वंचित, दुर्बल आणि सामाजिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेता यावे याकरिता आरटीई कायद्या अंतर्गत २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक वर्षे २०२५ – २६ करिता आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महापालिका क्षेत्रातील ६२७ शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या असून ११ हजार ३२० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी १४ जानेवारी पासून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातून आठवड्याभरात म्हणजे १४ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत १० हजार ५०६ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती आरटीई संकेतस्थळावरुन प्राप्त झाली आहे. तरी, ज्या पालकांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाही त्यांनी २७ जानेवारी पर्यंत आरटीईच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीत दत्तनगरमध्ये महारेरामधील, बेकायदा इमारतीचे विकासकाकडून तोडकाम

पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, याची पालकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10000 applications received for rte in a week thane news amy