लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : डोंबिवलीतील एका दहावीच्या विद्यार्थीनीचा मध्य रेल्वेच्या आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकात आसनगाव लोकल मधून रेल्वे मार्गात पडून मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. दहावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच या मुलीचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आकांक्षा जगताप (१६) असे मृत मुलीचे नाव आहे. ती डोंबिवली पूर्वेतील भोपर भागात आपल्या आई, वडील आणि बहिणीसोबत राहत होती. ती डोंबिवलीतील एका शाळेत दहावीत शिक्षण घेत होती. ती इयत्ता दहावीत होती. शनिवारी तिचा दहावीचा पहिला पेपर होता.

मंगळवारी सकाळी ती आपली आई, बहिणीसोबत मुंबईत सिध्दीविनायक मंदिर येथे गणपती दर्शनासाठी गेली होती. मुंबईतून गणपती दर्शन घेऊन आकांक्षा संध्याकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात कुटुंबीयांसह उतरली. रिक्षा पकडण्यासाठी ते रामनगर रिक्षा वाहनतळावर गेले. त्यावेळी आई, तिची बहिण पुढे होते. आकांक्षा मागे बाजारात काही पाहत असेल असे आई, बहिणीला वाटले. म्हणून ते रिक्षा वाहनतळावर तिची वाट पाहत थांबून राहिले. बराच वेळ आकांक्षा येत नाही म्हणून आई, बहिणीने पुन्हा पाठीमागे जाऊन रेल्वे स्थानकात बाजारात पाहणी केली तर ती कुठेच आढळून आली नाही.

आकांक्षाचे पालक तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात गेले. तेथील अधिकाऱ्याने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. आकांक्षा रिक्षा वाहनतळापासून काही अंतरावर आपल्या आईच्या पाठीमागे आल्याचे दिसते. त्यानंतर ती पुन्हा माघारी गेल्याचे सीसीटीव्हीत दिसते. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये ती फलाटावर उतरत असल्याचे दिसते.

मंगळवारी रात्री उशिरा आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकांच्या दरम्यान वेहळोली गाव हद्दीत रेल्वे मार्गात आकांक्षाचा मृतदेह पडला असल्याचे समाज माध्यमांवर सामायिक झाले. आकांक्षाच्या कुटुंबीयांना ही माहिती मिळताच ते तातडीने तिचा मृतदेह ठेवलेल्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात गेले. तिच्या डोक्याला दुखापत असल्याचे दिसून आले. आकांक्षा आसनगाव दिशेने गेलीच कशी, तिचे त्या भागात काय काम होते. हा अपघात की घातपात या दिशेने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला आहे.

शुक्रवारी रात्री खर्डी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे मार्गात एका तरूणीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी गेलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गरजे यांना दोन्ही बाजूकडून येणाऱ्या लोकलचा अंदाज न आल्याने लोकलची धडक बसून जखमी झाले आहेत.

आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानका दरम्यान आसनगाव लोकलमधून रेल्वे मार्गात पडून जखमी होऊन मरण पावलेल्या तरूणीच्या अपघाती मृत्यूचा तपास आम्ही करत आहोत. ही मुलगी डोंबिवलीला राहत होती. -पंढरीनाथ कांदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कल्याण लोहमार्ग ठाणे.