कल्याण – कल्याण, शहाड रेल्वे स्थानकात गेल्या २४ तासांच्या कालावधीत ११ प्रवाशांचे मोबाईल भुरट्या चोरांनी लंपास केले होते. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून सात चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून ११ चोरीचे मोबाईल जप्त केले.
अहमद शेख, विशाल काकडे, अन्सारी, सरजिल अन्सारी, सचीन गवळी, मंगल अली शेख, संदीप भाटकर अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा – मानव कल्याण केंद्राचे संस्थापक डॉ. मूलचंद छेडा यांचे निधन
कल्याण, शहाड, उल्हासनगर रेल्वे स्थानकांतून गेल्या चोवीस तासांच्या कालावधीत प्रवाशांकडील ११ मोबाईल चोरीला गेले होते. एकाच दिवसात एवढ्या चोऱ्या झाल्याने पोलीस चक्रावून गेले होते. सुट्टीचा हंगाम असल्याने नागरिक कुटुंबासह अधिक संख्येने गावी जात आहेत. हातात पिशव्या, मोबाईल, लहान मुले असा जामानिमा असल्याने लोकलमध्ये, एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवासी गडबडीत असतात. या संधीचा गैरफायदा घेत चोरटे प्रवाशांकडील मोबाईल लांबवित असल्याचे दिसून आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.