कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या महत्वाकांक्षी वळण रस्ते मार्गातील गांधारी-वडवली आणि अटाळी मार्गातील ११८ चाळींची बांधकामे पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने भुईसपाट केली. वळण रस्ते मार्गातील महत्वाचा अडथळा दूर झाल्याने मुंंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाला गांधारी-वडवली-अटाळी हा रखडलेला वळण रस्ता जोडणे शक्य होणार आहे. या रस्त्यामुळे टिटवाळा येथील प्रवाशांना रस्ते मार्गाने थेट कल्याणमध्ये येणे शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टिटवाळा -कल्याण-डोंबिवली ते शिळफाटा हेदुटणे हा कल्याण डोंबिवली पालिकेचा ३० किलोमीटर लांबीचा महत्वाकांक्षी बाह्य वळण रस्ता प्रकल्प आहे. या रस्ते मार्गाचे एकूण सात टप्पे आहेत. टप्पा क्रमांक सात हा टिटवाळा ते राज्य महामार्ग क्रमांक ३५ व ४० यांना जोडणारा आहे. मांडा-टिटवाळा हा चार किलोमीटर लांबीचा टप्पा क्रमांक सहा आहे. नऊ किलोमीटर लांबीचा टप्पा क्रमांंक पाच हा गांधारी ते मांडा आहे. हे टप्पे मागील सात ते आठ वर्षापूर्वीच बांधून पूर्ण झाले आहेत.

टिटवाळा ते गांधारी या वळण रस्ते मार्गात वडवली ते अटाळी दरम्यान ५६५ चाळींची जुनी बांधकामे होती. या बांधकामांमधील रहिवाशांचे पुनर्वसन केल्याशिवाय पालिकेला ही बांधकामे तोडता येत नव्हती. येथील रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन केल्यानंतर गेल्या महिन्यात या रस्ते मार्गातील ३१९ बांधकामे तोडण्यात आली. उरलेली ११८ बांंधकामे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली.

वडवली ते अटाळी वळण रस्ते मार्गातील अडथळा दूर झाल्याने एमएमआरडीए याठिकाणी तातडीने रस्ता बांधणीचे काम हाती घेणार आहे. टिटवाळा ते कल्याण रस्ते मार्गाचे काम मागील दहा वर्षापासून सुरू आहे. हे काम विहित वेळेत पूर्ण न झाल्याने आणि टिटवाळा-कल्याण रस्ते मार्ग बांधकामांच्या अडथळ्यांमुळे रखडल्याने महालेखापालांनी अहवालात ताशेरे ओढले होते.

या रस्ते मार्गातील टप्पा क्रमांक हेदुटणे-शीळ, टप्पा क्रमांक दोन शीळ-मोठागाव रस्ता भूसंपादन झालेले नाही. हे दोन्ही टप्पे आठ किमी लांबीचे आहेत. टप्पा क्रमांंक तीनमधील मोठागाव ते दुर्गाडी सात किमीचा टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुर्गाडी-गांधारी टप्पा क्रमांंक चार बांधून पूर्ण झाला आहे. हा टप्पा चार किमी लांबीचा आहे.

वडवली-अटाळी वळण रस्ते मार्गातील ११८ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले. या रस्त्यामुळे टिटवाळा ते कल्याण थेट वळण रस्त्याने जोडले जाणार आहेत.- प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.