कल्याण – कल्याण पूर्व काटेमानिवली भागात आपल्या आई, भावासह राहत असलेली अकरावीची एक विद्यार्थिनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मी दहावीची गुणपत्रिका हरवली आहे अशी तक्रार देण्यास जाते. तेथून मी ती कागदपत्रे घेऊन नवी मुंबईतील वसतीगृहात जाते असे आईला सांगून बुधवारी घरातून निघून गेली आहे. तीन दिवस झाले तरी अल्पवयीन मुलगी घरी न आल्याने बेपत्ता मुलीच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.
बेपत्ता मुलगी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात जुने विठ्ठल मंदिर परिसरात आपला २० वर्षाचा भाऊ आणि आईसह राहते. या पीडित मुलगीची आई मुंबईत गृहसेविकेचे काम करते. बेपत्ता मुलगी १७ वर्षाची आहे.
पीडित मुलीच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, माझी सतरा वर्षाची मुलगी इयत्ता अकरावीपर्यंत शिकली आहे. बुधवारी सकाळी तिने घरात आपणास माझी दहावीची गुणपत्रिका हरवली आहे. यासंबंधी मी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जाते. तेथून मिळणारी कागदपत्रे घेऊन मी नवी मुंबईत वसतीगृहात जाणार आहे. मुलीच्या या बोलण्यावर विश्वास ठेऊन आईने मुलीला बाहेर जाण्याची परवानगी दिली. बाहेरील सर्व कामे पूर्ण करून मुलगी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरी येणे अपेक्षित होते.
पाच वाजून गेले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून मी विठ्ठलवाडी भागात, तिच्या मैत्रिणींशी संपर्क साधला. पण ती कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे आपल्या मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असण्याची शक्यता वर्तवून मुलीच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली आहे. कोळसेवाडी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करत आहेत. मागील तीन महिन्याच्या काळात कल्याण पूर्व भागातून इतर दोन प्रकरणात तीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. कल्याण पूर्व भागात असे प्रकार वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.