विशेष श्रेणीतील दहावी उत्तीर्णाच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांत जागा अपुऱ्या

यंदा दहावीच्या निकालात ८० ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची मुंबई विभागातील संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी ठाणे जिल्ह्य़ातील विशेष श्रेणीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २४ हजारांहून अधिक आहे. त्या तुलनेत ठाणे परिसरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये जागा खूपच कमी असल्याने ठाण्यातल्या ठाण्यातच अकरावीत प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगणार आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनदेखील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अथवा शहराबाहेरील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे.

मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना कला विषयाचे गुण देण्यात आले. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली. यंदा ठाणे जिल्ह्य़ाचा निकाल ९०.५९ टक्के इतका लागला असून एकूण ९७ हजार ३६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या २४ हजार ६४१ एवढी आहे. तसेच प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होणारे ३३ हजार ७५१ विद्यार्थी आहेत. यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र सर्वानाच शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतील का यावर प्रश्नचिन्ह आहे.

chart

बऱ्याचदा विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांमध्ये जाण्याचा आग्रह धरतात. मात्र अपुऱ्या माहितीअभावी त्यांना तिथे प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होतात. शासनाने ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व महाविद्यालयांची संपूर्ण माहिती मिळवून ही प्रक्रिया पूर्ण केल्यास योग्य महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो.

डॉ. विद्या विजय हेडाव, उपप्राचार्या, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय.

Story img Loader