डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील पु. भा. भावे सभागृह भागातील श्रीधर म्हात्रे वाडी परिसरात एक पर्यटन कंपनी चालविणाऱ्या पती, पत्नीने एका नोकरदाराची पर्यटन कंपनीतील गुंतवणुकीच्या माध्यमातून १३ लाख ४५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. अशाच पध्दतीने इतर १२ जणांची या पती, पत्नीने फसवणूक केल्याचे फसवणूक झालेल्या नोकरदाराने विष्णुनगर पोलीस ठाण्यात रविवारी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
फसवणूक झालेल्या नोकरदाराने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण राहत असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील पु. भा. भावे सभागृह परिसरात श्रीधर म्हात्रेवाडी आहे. या परिसरात पती, पत्नीचे जोडपे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रवासाची पर्यटन कंपनी चालविते. या कंपनी चालकांशी आपली तोंड ओळख होती.
ही कंपनी चालविणाऱ्या चालकाने फसवणूक झालेल्या नोकरदाराला जानेवारी २०२३ मध्ये एक पर्यटनाची योजना आणली होती. यामध्ये राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पर्यटनाची योजना होती. या योजनेप्रमाणे पर्यटन कंपनीत पर्यटनासाठी गुंतवणूक केली की पर्यटक कंपनी पर्यटकांनी केलेल्या त्यांच्या मागणीप्रमाणे पर्यटन घडवून आणणार. त्यानंतर पर्यटनासाठी गुंतवलेल्या रकमेवर पाच ते दहा महिन्यांनी दामदुप्पट परतावा देणार.
पर्यटक कंपनी चालकाने ही योजना नोकरदाराला पटवून सांगितली. ही आकर्षक योजना असल्याने नोकरदाराने पर्यटक कंपनी चालकांच्या सल्ल्याप्रमाणे पर्यटन कंपनीला आपल्या बँक खात्यामधून एकूण १६ लाखाहून अधिकची रक्कम भरणा केली. या गुंतवणुकीच्या पर्यटक कंपनी चालकाने पावत्या नोकरदाराला दिल्या.
काही महिन्यांनी नोकरदाराने गुंतवणुकीप्रमाणे आपली पर्यटन सहल कधी निघणार आणि गुंतवणुकीवरील परताव्याविषयी विचारणा सुरू केली. पर्यटन कंपनी चालविणाऱ्या पती, पत्नीने तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तुमची फसवणूक होणार नाही, अशी वेळोवेळी आश्वासने देऊन नोकरदाराला आश्वासीत केले.
आपले ठरल्याप्रमाणे पर्यटन होणार आहे की नाही अशी सतत विचारणा केली की विविध कारणे देऊन पर्यटन कंपनी चालक नोकरदाराला शांत राहण्याबाबत सूचित करत होता. गुंतवणुकीवरील परताव्याबाबत पर्यटन कंपनी चालकाला सतत विचारणा केल्याने त्यांनी दोन लाख ६० हजार नोकरदाराला परत केले. तरीही ठरल्याप्रमाणे १३ लाख ४५ हजार रूपये पर्यटक कंपनी नोकरदाराची देणी होती.
आपले पर्यटन होत नाही. आपल्याला ठरल्याप्रमाणे परतावा मिळणे मुश्किल वाटू लागल्याने आपली फसवणूक पर्यटन कंपनी चालकाने केल्याचे नोकरदाराला वाटले. सप्टेंबर २०२३ मध्ये पर्यटन कंपनी चालक डोंबिवलीत नोकरदाराला शेवटचा दिसला. आपल्यासारखी इतर १२ जणांची या पर्यटन कंपनी चालकाने फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर नोकरदाराने विष्णुनगर पोलीस ठाण्यात पर्यटन कंपनी चालक पती, पत्नी विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी महाराष्ट्र गुंतवणूकदारांच्या हितसंबंधाचे रक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.