ठाणे : कोपरी येथील हरिओम नगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये अस्वच्छ जागेत १० विदेशी आणि दोन देशी श्वान बेकायदेशीररित्या बांधून ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यांना पुरेसे खाद्य पदार्थ दिले जात नव्हते. प्राणी प्रेमी संघटनांच्या मध्यस्थीनंतर या श्वानांची सुटका करण्यात आली आहे. यातील तीन श्वानांवर प्राथमिक उपचार सुरू असून उर्वरित श्वानांची प्रकृती स्थिर आहे. या श्वानांना बांधून ठेवणारा व्यक्ती कंपन्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी श्वान पुरविण्याचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे एक घोडा देखील आढळून आला आहे. त्याच्याकडे श्वानांची कोणतीही नोंदणी आढळून आली नसल्याची माहिती प्राणी प्रेमी संघटनेने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> इमारतीवरील लोखंडी पत्र्याचे शेड वाऱ्याने उडाले, टर्फवर खेळणारी सात मुले जखमी

हरिओम नगर येथील स्मशानभूमीच्या मागील बाजूस काही श्वान बेकायदेशीररित्या बांधून ठेवण्यात आल्याची माहिती सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप) या संस्थेला मिळाली होती. सुमारे आठवड्याभरापूर्वी कॅप संस्थेच्या सदस्यांनी या ठिकाणी पाहाणी केली. त्यावेळी तिथे विदेशी आणि देशी जातीच्या श्वानांना बांधून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी एक चित्रीकरण प्रसारित झाले होते. त्यामध्ये श्वानांना आहार दिला जात नव्हता. तसेच तिथे अस्वच्छता असल्याचे प्राणी प्रेमी संघटनांना आढळून आले. त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर शुक्रवारी दुपारी कॅप, पेटा आणि कलोटे ॲनमल ट्रस्ट या प्राणी मित्र संस्थेचे सदस्य त्याठिकाणी गेले. त्यांनी श्वानांना सोडण्याची विनंती केली. परंतु त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर संस्थांनी कोपरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी बोलाविले. त्याला पुन्हा सर्व श्वान तात्काळ सोडण्यास सांगितले. त्यानंतरही त्याने संस्थांसोबत वाद घातले. अखेर प्रकरण गुन्हा दाखल करण्यापर्यंत पोहचल्यानंतर त्या व्यक्तीने श्वानांना सोडण्याची कबूली दिली. हे सर्व श्वान दोन ते पाच वर्षांच्या वयोगटातील आहेत. यातील नऊ श्वानांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना कलोटे ॲनमल ट्रस्ट या संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर उर्वरित तीन श्वानांना उपचारासाठी कॅप संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. संस्थांना या शेडमध्ये एक घोडा देखील आढळून आला आहे.

हेही वाचा >>> VIDEO : ठाण्यात पावसाचा कहर; फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर कोसळले टीनशेड, सात खेळाडू गंभीर जखमी

– या पत्र्याच्या शेडमध्ये लॅब्राडोर, रॉटविलर, शीत्जू, बेल्जियम शेफर्ड हे विदेशी जातीचे श्वान आढळून आले आहेत. श्वानांना बेकायदेशीररित्या बांधून ठेवण्यात आले होते. ज्या व्यक्तीने त्यांना बांधून ठेवले. त्याच्याकडे श्वानांची कोणतीही नोंद नाही. तसेच त्याने हे श्वान कोठून आणले याची देखील माहिती देत नाही. – सुशांक तोमर, संस्थापक सदस्य, कॅप.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 dogs including foreign breeds rescued from illegal shelter in raid by police zws
Show comments