ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही, याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. गेल्या सहा दिवसांत पालिकेच्या पथकाला १ हजार २४७ दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे आढळून आले असून यात सर्वाधिक दुकाने वागळे इस्टेट, कोपरी-नौपाडा आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील आहेत. या दुकांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याने दुकानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचननेनुसार महापालिका, नगरपंचायत व नगरपरिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मराठी पाट्या नसलेल्या दुकाने आणि विविध आस्थापनांना नोटीसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली असून सहाय्यक आयुक्तांनी पथके तयार करून शहरात दुकानांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यात दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याची खातरजमा करण्यात येत आहे. प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावरील अक्षर मराठी भाषेत आहेत का, मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान आहे का, याची तपासणी पथकाकडून केली जात आहे. यामध्ये गेल्या सहा दिवसांत पालिकेच्या पथकाला १ हजार २४७ दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे आढळून आल्या असून या दुकानांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. या दुकानांना ३० डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठविण्यात येईल. कारण कारवाईचे अधिकार या विभागाला आहेत, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

हेही वाचा – ठाणे ते नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट नवा मार्ग; उन्नत दुमजली मार्गिकेबाबत ‘सिडको’कडून अभ्यास सुरू

हेही वाचा – ठाणे ग्रामीणमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी ठप्प, महास्वयंम पोर्टलचा सर्व्हर संथगती

मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांची आकडेवारी

प्रभाग समिती – मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांची संख्या

कोपरी-नौपाडा – २०६

माजिवाडा-मानपाडा – ७४

लोकमान्य-सावरकरनगर – १२८

उथळसर – २१०

वर्तकनगर – ५४

कळवा – ६७

मुंब्रा – १३७

दिवा – १५४

वागळे इस्टेट – १९७

एकूण – १२२७