कल्याण- महावितरणच्या कल्याण पूर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत कल्याण पूर्व भागातील १३ बंगले मालकांनी वीज मीटरमध्ये फेरबदल करुन चोरुन वीज घेऊन विजेचा वापर केला असल्याचे उघड झाले आहे. या १३ बंगले मालकांनी ७८ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी केली आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा >>> ठाण्यातील महामार्गाच्या जबाबदारीचा चेंडू पालिकेने ढकलला एमएआरडीच्या कोर्टात
या बंगल्यांमध्ये वातानुकूलित यंत्र, विद्युत सेवेच्या सर्व सुविधा आढळून आल्या आहेत. काहींचे बंगले पूर्ण वातानुकूलित असल्याचे तपास पथकाला आढळून आले आहे. कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत सर्वाधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर महावितरणच्या भरारी पथकाने वीजचोरी शोध मोहीम तीव्र केली आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात १३ बंगले मालकांकडील ३ लाख २७ हजार युनिट विजेची चोरी पकडण्यात आली. यामध्ये २७ गावातील भाल येथील एकाच बंगल्यात विनामीटर केबल टाकून सुरू असलेल्या ६ लाख ७२ हजारांच्या वीज चोरीचा समावेश आहे. नेवाळी येथील एका जीन्स कारखान्याची १३ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. नेवाळी, धामटण, भाल, वसार, व्दारर्ली आदी परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात या परिसरात ५९ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून ६८ लाख ४७ हजार रुपयांच्या वीजचोरी पकडण्यात आली.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींवर पालिकेचा हातोडा?
संबंधितांना वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले आहे. ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.