कल्याण – बीड मधील एका गावातील शेतकरी कल्याणमध्ये गांजाची तस्करी करताना साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखालील अंमली पदार्थ विरोध पथक आणि बाजारपेठ पोलिसांनी अटक केला आहे. या शेतकऱ्याकडून पोलिसांनी दोन लाख ५० हजार रूपये किमतीचा १३ किलो गांजा जप्त केला आहे.

शकील युनूस शेख (२५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील शेख वस्ती हेवर शिंगा गावातील रहिवासी आहे, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. धुळवडीच्या दिवशी बीड जिल्ह्यातील एक शेतकरी कल्याणमधील दुर्गाडी किल्ला भागात गांजा विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस नि्रीक्षक सुरेश सिंग गौड यांना मिळाली होती. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक दुकळे, गु्न्हे प्रकटीकरण शाखा, अंमली पदार्थ विरोध पथकाने दुर्गाडी किल्ला भागात सापळा लावला.

ठरल्या वेळेत एक इसम दुर्गाडी किल्ला भागात हातात पिशवी घेऊन रेंगाळत होता. पोलीस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. हा इसम कुठेही जात नाही लक्षात आल्यावर सापळ्यातील एका साध्या वेशातील पोलिसाने त्याला हटकले. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली. त्याच्या जवळ १३ किलो गांजा आढळून आला.

या गांजाची बाजारातील किंमत दोन लाख ५० हजार रूपये आहे. शकील शेख असे आपले नाव असल्याचे आणि आपण बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात अंंमली पदार्थ विरोधी तस्करी कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. शकील कोणाच्या इशाऱ्यावरून कल्याणमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आला होता. याचा तपास पोलीस करत आहे. यापूर्वी कल्याण परिसरात धुळे परिसरातील गांजा तस्कर पोलिसांकडून अटक केले जात होते.

आता बीड जिल्ह्यातून शेतकरी गांजा विक्रीसाठी कल्याण परिसरात येऊ लागल्याने बीड जिल्ह्यातही गांजाची लपून शेती केली जात असावी असा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्या, मारहाणीने मागील काही महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे.