पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच निसर्गसहलीचे वेध लागतात. डोंगरदऱ्यांच्या कपाऱ्यांतून वाट काढत उंचावरून कोसळणारे फेसाळते धबधबे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत अशा धबधब्यांच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमुळे पर्यटकांमध्ये असुरक्षिततेची भावनाही निर्माण होऊ लागली आहे. याच पाश्र्वभूमीवर वनविभागाने माळशेज घाटामध्ये १३ नवे धबधबे पर्यटकांसाठी खुले करून दिले आहेत. निसर्गसौंदर्याने आधीच नटलेल्या हिरव्यागार माळशेज घाटाला त्यामुळे फेसाळत कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांचा साज चढला आहे.
मुरबाडपासून ५० किमी अंतरावर असलेला  माळशेज घाट हा मुंबई-ठाण्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. माळशेज घाट आणि नाणे घाट असे दोन घाट या भागात असून या घाटांचे वैशिष्टय़ म्हणजे रस्त्यालगत धबधबे आणि एका बाजूला खोल दरी अशी या घाटाची रचना आहे. पावसाळ्याचा जोर सुरू झाल्यानंतर या भागातील धबधबे खुले होतात. तेथे पर्यटकांची गर्दी जमते.  त्यामुळे ठाणे वनविभागाच्या वतीने आणखी धबधब्यांची निर्मिती केली जात असून यंदाच्या वर्षभरामध्ये माळशेज परिसरात १३ धबधबे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांनी दिली.
धबधब्याखाली प्रामुख्याने भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. अशा वेळी पाण्यामुळे घसरणाऱ्या दगडांचा धोका असतो. हे टाळण्यासाठी वनविभागाने उन्हाळ्याच्या दिवसातच धोकादायक दगड बाजूला केले. तसेच काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह रोखणारे अडथळे दूर करण्यात आले. शक्यतो मुख्य रस्त्यावरून जवळ असलेले आणि सहज पोहोचता येणारे असे धबधबे तयार करण्यात आले. धबधब्यावर जाताना पुरेशी काळजी घेतल्यास अनर्थ टाळता येऊ शकतो. वनविभागाकडून पुरेशी माहिती घेऊनच धबधब्यांचा आनंद लुटा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Story img Loader