ठाणे : शहरात राहणारा एक १३ वर्षीय मुलगा आंबा काढण्यासाठी झाडावर चढला. आंबा काढत असताना, तोल जाऊन तो झाडावरुन खाली पडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्या हाताची शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्याच्या कुटूंबावर आली. परंतू, ही शस्त्रक्रिया प्रचंड गुंतागुंतीची असल्याने त्यासाठी खूप खर्च येणार होता. अखेर ठाणे जिल्हा रुग्णालयात या मुलाच्या हाताची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी ठाण्यात राहणारा १३ वर्षीय प्रतीक (नाव बदलले आहे) आंब्याच्या झाडावर चढला होता. मात्र, झाडाचा अंदाज आला नसल्यामुळे तोल जाऊन तो खाली पडला. त्याच्या शरीराचा सर्व भार हातावर आल्याने उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यासह, त्याचे मनगट आणि कोपराकडील हाड मोडले. त्यामुळे प्रचंड वेदना प्रतीकला होत होत्या.
हाताची शस्त्रक्रिया करण्या शिवाय त्याच्या कुटूंबासमोर कोणताही पर्याय राहिला नव्हता. परंतू, शस्त्रक्रिया करायचे म्हटले तर,खासगी रुग्णालयात त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार. आर्थिक परिस्थिती हालाखिची असल्यामुळे शस्त्रक्रिया करायची कशी असा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. म्हणून त्याच्या कुटूंबाने त्याला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जोखमीची शस्त्रक्रिया…
प्रतीकच्या हाताला जबर मार लागल्याने त्याच्या हाताचा एक्सरे काढण्यात आला. त्यामध्ये त्याच्या हाताची दोन्ही हाड एक्सरेमध्ये तुटलेली दिसत होती. त्यामुळे जोखमीची शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान रुग्णालयासमोर होते. प्रतीक लहान असल्याने रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
या शस्त्रक्रियेसाठी तब्बल दोन तास लागले. यावेळी रुग्णालयाचे वरिष्ठ अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. विलास साळवे, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. आदेश रंगारी, डॉ.अजित भुसागरे, भुलतज्ञ डॉ. रुपाली यादव, मिलिंद दौंडे यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीकच्या हातावर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.