ठाणे : भिवंडी येथे अवघ्या १०० रुपये आणि मोबाईलसाठी विनोद पागे या १३ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नितीन वाघे (४०), पद्माकर भोईर (२०) आणि अजय मांजे (२१) यांना अटक केली आहे.
भिवंडी येथील हऱ्याचा पाडा परिसरात विनोद हा वास्तव्यास होता. शहापूर येथील आश्रम शाळेत इयत्ता नववीमध्ये तो शिक्षण घेत होता. त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने तसेच आईने दुसरा विवाह केला. त्यामुळे त्याला कुटुंबियांनी शिकण्यासाठी आश्रम शाळेत ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी त्याला त्याच्या आईने १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन दिला होता. रक्षा बंधनाचा सण असल्याने तो त्याच्या काकांकडे राहण्यासाठी आला होता. १८ ऑगस्टला त्याला काकांनी खरेदीसाठी १०० रुपये देऊन बाजारातून साहित्य आणण्यास सांगितले. रात्री उशीरपर्यंत तो घरी आला नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याच्या काकांनी आश्रम शाळेत विचारणा केली असता, तो आश्रम शाळेत देखील परतला नव्हता. अखेर २१ ऑगस्टला त्याच्या काकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पडघा पोलीस ठाण्यात दिली.
हेही वाचा >>> जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून उभारलेल्या बेकायदा इमारतीला नोटीस; इमारतीत प्रवेशासाठी रस्ता नसल्याने गाळ्यामधून प्रवेशव्दार
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी दुचाकीवर विनोदला एक व्यक्ती नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दुचाकी क्रमांकाच्या आधारे माहिती घेतली असता, तो व्यक्ती नितीन वाघे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी वाघे याला २४ ऑगस्टला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने इतर दोघांच्या मदतीने त्याचा खून केल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे साथिदार पद्माकर आणि अजय या दोघांनाही ताब्यात घेतले. तिघांनाही पडघा पोलिसांनी अटक केली आहे. हत्येनंतर त्यांनी विनोदचा मृतदेह वाडा येथील माळरानात फेकून दिला होता. त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे.
हेही वाचा >>> कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
मोबाईल आणि १०० रुपये
विनोद हा मोबाईल घेऊन बाजारात गेला होता. बाजारात जाण्यासाठी विनोद याने नितीन याची दुचाकी थांबवून बाजारात सोडण्याची विनंती केली. परंतु त्याने त्याला वाडा येथील माळरानात नेले. तिथे नितीन आणि त्याच्या साथिदारांनी त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह माळरानात फेकून दिला. तसेच त्याचा मोबाईल आणि १०० रुपये घेऊन तेथून निघून गेले.
© IE Online Media Services (P) Ltd