मध्य रेल्वेला दंडवसुलीतून भरीव महसूल

विनातिकीट प्रवास करून तिकिटाचे दहा-वीस रुपये वाचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे मार्गावरील असंख्य प्रवाशांच्या अंगलट आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून दंड स्वरूपात वसूल करण्यात आलेल्या रकमेमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत मात्र चांगलीच भर पडत आहे. गेल्या वर्षभरात या माध्यमातून मध्य रेल्वेने तब्बल १३० कोटी ४४ लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १ लाख ९४ हजार असून या प्रवाशांकडून ८ कोटी ३८ लाख रुपयांइतका दंड रेल्वेने जमा केला आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात २ लाख १६ हजार प्रवाशांवर कारवाई केली असून त्यातून ९ कोटी ३५ लाख रुपये इतके उत्पन्न जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ११.३२ टक्क्यांनी तर त्यांच्याकडून आकारणाऱ्या आलेल्या दंडाच्या रकमेत ११.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या वर्षांत एकूण २६ लाख ५७ हजार प्रवाशांवर कारवाई केली असून त्यातून १३० कोटी ४४ लाख रुपये रेल्वेच्या खात्यात जमा झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत १७.३८ टक्के तर दंड आकारून जमा केलेल्या रक्कमेत १९.७७ टक्के वाढ झाली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी यूटीपी, स्मार्ट कार्ड अशा अनेक सुविधा रेल्वेतर्फे पुरवण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांकडून हमखास या नियमांची पायमल्ली होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader