कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बल्याणी टेकडी परिसर बेकायदा बांधकामांचे आगर झाली होती. या बेकायदा बाधकामांमध्ये समाजकंटकांचा निवास होण्याची भीती स्थानिकांकडून पालिका, पोलिसांकडे व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी मागील चार दिवस सलग कारवाई करून टिटवाळा बल्याणी टेकडी, उंबार्णी, राजेश्वरी इमारती लगत असलेल्या १३० हून अधिकच्या बेकायदा चाळी, व्यापारी गाळे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.
मागील २० वर्षाच्या कालावधीत अ प्रभागातील टिटवाळा मांडा भागात झालेली ही सर्वात मोठी बेकायदा बांधकामांविरूध्दची कारवाई मानली जात आहे. टिटवाळ्यातील वाढत्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी आयुक्त डाॅ. जाखड यांच्याकडे येत होत्या. या बांधकामांवर कारवाई करा असे आदेश देऊनही यापूर्वीचे अधिकारी कारवाई करण्यात टंगळमंगळ करत होते. धडक कारवाई करणारा अधिकारी म्हणून आयुक्त डाॅ. जाखड यांनी अधीक्षक प्रमोद पाटील यांची अ प्रभागात साहाय्यक आयुक्त पदावर गेल्या आठवड्यात नियुक्ती केली.
पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या आठवड्यापासून साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा, बल्याणी टेकडी, उंबार्णी, बल्याणी रस्ता, मांडा परिसरातील बेकायदा चाळी तोडण्याची मोहीम सुरू केली. चार दिवसात अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने १३० हून अधिक बेकायदा चाळी जमीनदोस्त केल्या आहेत. यामध्ये काही व्यापारी गाळे, निर्माणाधीन चाळी, जोते यांचा समावेश होता.
यापूर्वी अशी कारवाई सुरू झाली की काही राजकीय मंडळी अधिकाऱ्यांना संपर्क करून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होती. कारवाई सुरू होण्यापूर्वीच भूमाफियांना आपल्या चाळींवर कारवाई होणार असल्याची माहिती अ प्रभाग कार्यालयातून गुप्तपणे मिळायची. ही जुनी पध्दत मोडून काढण्यासाठी साहाय्यक आयु्क्त प्रमोद पाटील यांनी तोडकाम पथकाला पूर्वसूचना न देता अचानक बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी तोडकाम ताफा नेण्याची पध्दत सुरू केली. राजकीय दबाव नको म्हणून पाटील आपला मोबाईल कारवाई पूर्ण होईपर्यंत बंद ठेवत होते. या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
टिटवाळा बल्याणी परिसरात जमीनदोस्त केलेल्या बेकायदा चाळी पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत. अ प्रभागात यापुढे एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. बेकायदा बांधकामांविरुध्दची मोहीम अशीच पुढे सुरू राहणार आहे. प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग, टिटवाळा.