कल्याण – मांडा टिटवाळा भागातील बल्याणी टेकडी, उंभार्णी परिसरातील १५० हून अधिक बेकायदा चाळी भुईसपाट केल्यानंतर बुधवारी सकाळपासून अ प्रभागाच्या तोडकाम पथकान टिटवाळ्यातील सांगोडा रस्ता स्मशाभूमी भागात वनराई नष्ट करून बांधलेली १३० बेकायदा जोती जेसीबाच्या साहाय्याने भुईसपाट केली.
या १३० जोत्यांसाठी या भागातील जुनाट वृक्ष भूमाफियांनी तोडून टाकले होते. या बेकायदा जोत्यांवर बेकायदा चाळी उभारण्याची जोरदार तयार भूमाफियांनी केली होती. या बेकायदा चाळींची उभारणी सुरू होण्यापूर्वीच अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या आदेशावरून बुधवारी सकाळपासून सांगोडा रस्ता भागातील स्मशानभूमी परिसरातील सपाटी, टेकडी भागात उभारलेल्या नवीन जोत्यांची बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.
या ठिकाणच्या विटा इतर साहित्याची तोडकाम पथकाने नासधूस केली. भूमाफियांना पुन्हा या ठिकाणी जोते, बेकायदा चाळी उभारता येणार नाहीत अशा पध्दतीने या भागातील १३० जोत्यांची कामे उखडून टाकण्यात आली. काही राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने टिटवाळा भागात भूमाफिया बेकायदा चाळी उभारत असल्याच्या तक्रारी आहेत. आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून टिटवाळ्यात बेकायदा बांधकामांच्या विरुध्द कारवाई सुरू आहे. या कारवाईत अडथळा आणला तर आपली सरकारी कामात अडथळा आणला म्हणून स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद होईल. आणि येणाऱ्या पालिका निवडणुकीत आपल्याला उमेदवारी अर्ज भरणे मुश्किल होईल, या भीतीने टिटवाळा परिसरातील एकही राजकारणी या कारवाईला विरोध करण्यासाठी पुढे येत नसल्याची चर्चा आहे.
तोडकामाची कारवाई सुरू करण्यापूर्वीच साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील हे आपला मोबाईल फोन बंद करून टाकतात. त्यामुळे कोणीही वरिष्ठ नेत्याला ही कारवाई रोखण्यासाठी साहाय्यक आयुक्तांचा संपर्क होत नाही. या सलगच्या कारवाईमुळे भूमाफियांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. मागील अनेक वर्षानंतर प्रथमच टिटवाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदा चाळींविरुध्द कारवाई झाली आहे. अशीच कारवाई यापूर्वी आय प्रभागात असताना साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी बेकायदा चाळी आणि इमारतींविरुध्द केली होती. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांंनी दोनशेहून अधिक बेकायदा चाळी, १० हून अधिक बेकायदा इमारती आपल्या दीड वर्षाच्या कालावधीत भुईसपाट केल्या होत्या.
बल्याणी, बनेली येथील बेकायदा चाळी भुईसपाट केल्यानंतर बुधवारी सकाळपासून सांगोडा भागातील बेकायदा १३० जोते तोडकाम पथकाने भुईसपाट केले. नवीन, निर्माणाधीन एकही बेकायदा बांधकाम मांडा, टिटवाळ्यात दिसणार नाही, उभे राहणार नाही या विचारातून ही बेकायदा बांधकामांविरुध्दची तोडकाम मोहीम सुरूच राहणार आहे.- प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.