लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण – मागील वर्षभरात विविध गुन्ह्यांमध्ये कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर पोलिसांनी १३० जणांना अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाने (मोक्का) कारवाई केली आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या पूर्व प्रादेशिक विभागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावेळी गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. गुन्ह्यातील आरोपी पकडण्याचे प्रमाण अधिक आहे, असे पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी सांगितले.२०२२ मध्ये महिलांविषयी विनयभंग, बलात्कार, छेडछाड असे एकूण ११४५ गुन्हे दाखल होते. २०२३ मध्ये हे प्रमाण १२०२ झाले आहे. यावर्षी अशा प्रकरणातील ९६ टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. महिलांच्या तक्रारींना प्रथम प्राधान्य दिले जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी वाचा-डोंबिवलीत किराणा दुकानात विमल पान मसल्याची विक्री, देवी चौकातील दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल
२०२३ मध्ये मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी, विनयभंग, बलात्कार, घरफोडी, संघटित गुन्हेगारी असे एकूण पाच हजार ६५३ गुन्हे उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होते. २०२२ मध्ये हे प्रमाण पाच हजार ४७७ होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांमध्ये १७६ नी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये गुन्हा उघडकीला आणण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२३ मध्ये संघटित गुन्हेगारीचे एकूण दोन हजार ३६३ गुन्हे दाखल होते. २०२२ मध्ये हे प्रमाण एक हजार ९०४ होते. यावर्षी या गुन्ह्यांमध्ये ४५९ नी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये दारूबंदीचे ५७५ गुन्हे दाखल होते. २०२२ मध्ये हे प्रमाण ५६९ एवढे आहे. शहरात जुगाराचे प्रमाण वाढत असल्याचे पोलीस तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. २०२३ मध्ये जुगारीचे ३२२, तर २०२२ मध्ये २१६ गुन्हे दाखल आहेत. हे अड्डे बंद करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.
आणखी वाचा-कल्याण, डोंबिवलीत ९० तळीरामांवर कारवाई; मद्य पिऊन चालवित होते दुचाकी, मोटार कार
२०२२ मध्ये पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटण्याच्या १३१ घटना घडल्या होत्या. चालूवर्षी हे प्रमाण ७६ आहे. या गुन्ह्यातील ७३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३८ लाख ३६ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. २०२३ मध्ये घरफोडीच्या ३४६ घटना घडल्या. यामधील १८७ गुन्हे उघडकीला आणले आहेत. २०२२ मध्ये ३५१ गुन्हे दाखल असून १८३ गुन्हे पोलिसांनी उघडकीला आणले आहेत.
२०२३ मध्ये वाहन चोरीच्या ७२१ घटना घडल्या आहेत. यामधील २९९ गुन्हे उघडकीला आणले आहेत. २०२२ मध्ये वाहन चोरीच्या ८०५ घटना घडल्या आहेत. यामधील ३६६ गुन्हे उघडकीला आणले आहेत. २०२३ मध्ये २१ गुन्ह्यांतील आरोपींवर मोक्का कायद्याने कारवाई करून ४९ जणांना अटक करण्यात आली आहे. २०२२ मध्ये २२ गुन्ह्यांमध्ये ८१ आरोपी अटक करण्यात आले आहेत. वर्षभरात १३० आरोपी अटक केले आहेत, असे अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी सांगितले.