अंबरनाथ: ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनीही नुकतीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेचे २५ नगरसेवक होते त्यातील २० नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण – डोंबिवलीनंतर आता अंबरनाथ शहरातही शिवसेनेत उभी फूट पाहायला मिळते आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Political Crisis: खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की तुमची?; एकनाथ शिंदे यांनी दिलं उत्तर; म्हणाले…
दोन आठवड्यांपूर्वी राज्यात शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. शिंदे यांच्यासोबत किणीकर गुवाहाटीलाही उपस्थित होते. त्यांच्या या भूमिकेनंतर अंबरनाथ शहरात त्यांच्याविरुद्ध फलकबाजी करण्यात आली होती. तर त्यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी शक्ती प्रदर्शनही केले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील विविध महापालिकांच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. सुरुवातीला ठाणे महापालिकेतील तर पुढे नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली या महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आता अंबरनाथ नगरपालिकेतील सुमारे २० नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
नक्की वाचा >>मनसेला मंत्रिपद दिले जात असेल तर आमचा त्याला विरोध – रामदास आठवले
स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी नुकतीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, प्रज्ञा बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, रवी पाटील, परशुराम पाटील, उमेश गुंजाळ, गणेश कोतेकर, रवि करंजुले, किरण कांगणे, पुरुषोत्तम उगले, सुवर्णा साळुंखे, संदीप लोटे, शैलेश भोईर हे माजी नगरसेवक आणि शिवसेना तसेच युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते. अंबरनाथ नगरपालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वीच दोन गट उघडपणे सक्रिय होते. यातील आमदार डॉ. किणीकर यांच्या गटाच्या नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर शिवसेनेत आहेत. त्यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्यासह महिला आघाडीने नुकतेच आमदार किणीकर यांना पालिका मुख्यालयात घेराव घालून घोषणाबाजी केली होती. त्यामुळे हा गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे दिसून आले आहे.