कल्याण मधील गांधारी भागात राहत असलेल्या एका महिलेला आम्ही तुम्हाला एका पतपेढीतून कर्ज मंजूर करुन देतो असे सांगून महिलेकडून कर्ज मंजुरीच्या नावाखाली विविध प्रकारचे १४ लाख रुपयांचे प्रक्रिया शुल्क वसूल करुन महिलेची फसवणूक केली आहे.खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी महिलेच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल झाला आहे.अनिता प्रभाकर पुजारी (रा. ऋतु रिव्हरसाईट इस्टेट, अग्रवाल महाविद्यालया जवळ, गांधारी, कल्याण) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. दिनेश भांजी, कुतुब रस्सीवाला, राहुल जैन आणि इतर अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. ऑक्टोबर २०२० पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री शिंदे, मंत्री चव्हाण यांच्यातील ‘खड्डे निधी’ शीतयुध्दाला पूर्णविराम? १४०० कोटीची कल्याण-डोंबिवलीत रस्ते विकास कामे

पोलिसांनी सांगितले, अनिता पुजारी यांना कर्जाची गरज असल्याने त्या वित्तीय संस्थांमधून कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यांना ऑक्टोबर २०२० मध्ये आरोपी दिनेश, कुतुब, राहुल हे भेटले. त्यांनी आपण जेकेव्ही मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी या पतपेढीचे पदाधिकारी आहोत असे खोटे सांगितले. या पतपेढीची ओळखपत्र आरोपींनी फिर्यादी अनिता यांना दाखविल्याने त्यांचा आरोपींच्या बोलण्यावर विश्वास बसला. अनिता यांचा विश्वास संपादन करुन त्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया आरोपींनी सुरू केली. ही कर्ज मंजुरी होण्यासाठी पतपेढीत विविध प्रक्रिया पार पाडव्या लागतात. त्यासाठी काही शुल्क भरणा करावा लागतो, असे सांगून आरोपींनी गेल्या दोन वर्षात अनिता यांच्याकडून १४ लाख रुपये विविध टप्प्यांनी वसूल केले.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये इंटरनेट सेवेचा व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी गुन्हेगाराचा हैदोस

कर्जाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनिता यांनी आरोपींकडे कर्ज रक्कम खुली करण्याची मागणी केली. आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा करण्यास सुरुवात केली. वारंवार संपर्क करुनही आरोपी योग्य उत्तरे देत नाहीत. कर्ज कधी मिळणार ते सांगत नाहीत. त्यामुळे अनिता यांनी कर्जाच्या शुल्कासाठी भरलेली रक्कम परत करण्याची मागणी आरोपींकडे सुरू केली. त्यानंतर आरोपींनी अनिता यांना प्रतिसाद देणे बंद केले. त्यांनी आपले मोबाईल बंद ठेवण्यास सुरुवात केली. आरोपींकडून आपणास कर्ज नाहीच पण आपल्याकडून १४ लाख रुपये वसूल करुन त्या रकमेचा अपहार केला आहे, असे अनिता यांच्या निदर्शनास आले. त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Story img Loader