लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: येथील खडकपाडा भागातील वसंत व्हॅलीमध्ये राहणाऱ्या सुस्थितीत कुटुंबातील महिलने त्यांच्याच घरात गृहसेविकेचे काम करणाऱ्या एका ५० वर्षाच्या महिलेची १४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दिलेले पैसे परत करा म्हणून तगादा लावल्यानंतर आरोपीच्या घरातील पुरूष मंडळींनी या महिलेचे अपहरण करुन तिला मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला आहे. मागील नऊ वर्षापासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू आहे.

घर कामाच्या निमित्ताने या गृहसेविकेने दुबई, आफ्रिका देशात जाऊन भारतामधील रहिवासी असलेल्या काही नोकरदारांच्या घरात काम केले आहे. उल्हासनगर मध्ये राहणारी ही पीडित महिला घरात लहान मुले सांभाळणे, वृध्दांचा सांभाळ, त्यांना मसाज करणे, घरगुती कामे करणे अशी कामे करुन उदरनिर्वाह करते. ती आपल्या मुलासोबत राहते.

आणखी वाचा-डोंबिवली एमआयडीसीत दुर्गंधीयुक्त रसायन मिश्रित सांडपाणी रस्त्यावर

पोलिसांनी सांगितले, घरकाम करणाऱ्या या पीडित महिलेची १० वर्षापूर्वी ओळख घरकामाच्या माध्यमातून सोनिया निक्की मूलचंदानी (रा. साईप्रेस इमारत, वसंत व्हॅली, खडकपाडा, कल्याण) यांच्या बरोबर झाली. सोनिया यांच्या घरातील स्वयंपाक घरातील, घरातील वृध्द मंडळींचे सेवा करण्याचे काम दिवसभर पीडित महिला करत होती. सोनिया यांच्या घरात पती निखील, सासू अंजू, मुलगा विशाल सासरे शाम असा परिवार आहे. निखील यांचे कल्याणमधील सिंडीगेट भागात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीचे दुकान आहे. २०१३ ते २०१७ पीडित महिलेने सोनिया यांच्या घरात घरकाम केले. सोनिया कुटुंब आता उल्हासनगर मधील नेताजी चौकातील अमृत संकुलात राहते.

सोनिया हिने २०१४ मध्ये पीडित महिलेकडून बहिणीला देण्यासाठी ५० हजार रुपये उसने घेतले. ते पैसे नंतर सोनियाने परत केले. सोनियाने पुन्हा पीडितेकडून तीन लाख रुपये उसने मागितले. हे पैसे आपणास बहिणीचा मुलगा साहिल इब्राहिम शेख याला व्यायामशाळा टाकायची आहे असे सांगितले. सोनिया यांच्याकडून पैसे परत मिळतात म्हणून पीडितेने पुन्हा सोनियाला तीन लाख रुपये दिले. अशाप्रकारे विविध कारणे सांगून सोनियाने पीडितेकडून १४ लाख रुपये उकळले. हे पैसे मी परत करणार आहे असा उसनवार करारनाम उल्हासनगर न्यायालयातून नोंदणीकृत करुन घेतला.

आणखी वाचा-अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

पीडितेने पैसे करत करण्यासाठी तगादा लावल्यानंतर सोनियाने तिला वेगवेगळ्या बँकांचे धनादेश दिले. ते बँकेत न वटता परत येत होते. सोनियाने माझा भाऊ तुला या पैशांच्या बदल्यात वांगणी येथे १८ लाखाचे घर देणार आहे, असे सांगितले. तुम्ही माझी फसवणूक करत आहात मी आता पोलीस ठाण्यात तक्रार करते, असा इशारा पीडित महिलेने सोनिया यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये दिला. त्याचा राग सोनियाला आला. तिने पीडितेला खडकपाडा येथील माधव संकल्प इमारती जवळ बोलून घेतले. तेथे मोटारीतून सोनिया मूलचंदानी, पती निखील, अनिल चंद्रमणी, झैनाब शेख आले होते. पीडितेला जबरदस्तीने मोटारीत बसविले. मोटारीत निखील, अनिल यांनी तिचा विनयभंग केला, अशी महिलेची तक्रार आहे. जिवंत रहायचे असेल तर पैसे विसरुन जा अशी धमकी महिलेला मूलचंदानी कुटुंबीयांनी दिली. पैसे परत मिळण्याची खात्री नसल्याने आणि आरोपींनी विनयभंग केल्याने पीडितीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 lakh fraud with domestic servant by house owner in kalyan mrj
Show comments