लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, अनेक पर्यावरणप्रेमी संस्था, नागरिक यांनी दिवाळीच्या सणाच्या काळात प्रदूषण करणारे फटाके फोडू नका. फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन करूनही कल्याण, डोंबिवली शहरातील नागरिकांनी मागील तीन दिवसाच्या दिवाळी सणाच्या काळात वेळेचे कोणतेही बंधन न पाळता नागरिकांनी फटाके फोडले. अशा फटाक्यांचा रस्त्यांवर, सोसायट्यांच्या परिसरात पडलेला १६ टन कचरा पालिकेच्या घनकचरा विभागाने जमा केला आहे.

फटाके फोडून झालेला कागदी आठ टन कचरा, फटाक्यांंवरील प्लास्टिक वेष्टना सहा टन कचरा पालिकेच्या सफाई कामगारांनी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांच्या विविध भागातून जमा केला आहे. कल्याण डोंबिवली शहरांमध्ये शहर स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. कचरा मुक्त शहरे करण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. दिवाळीच्या सणाच्या काळात रस्त्यांवर अधिक प्रमाणात फटाक्यांचा कचरा पडण्याची शक्यता गृहीत धरून दैनंदिन सफाई बरोबर फटाक्यांमुळे पडणारा कचरा उचलण्याची विशेष नियोजन घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी निश्चित केले होते.

आणखी वाचा-ठाणे : वाहनतळात लागलेल्या आगीत ११ दुचाकी जळून खाक, तीन कारचे नुकसान

गेल्या शुक्रवारी दिवाळी सुरू झाल्यापासून पालिकेला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. सफाई कामगार सुट्टीच्या दिवशी कामावर आले नाहीतर फटाक्यांचा कचरा रस्तोरस्ती पडून कचऱ्याचे ढीग तयार होतील हा विचार करून उपायुक्त पाटील यांनी सुट्टीच्या दिवशीही सफाई कामगारांच्या सुट्टीचे नियोजन करून गटागटाने कामगारांना सफाई कामासाठी कामावर बोलविले होते. त्यामुळे पालिकेला सुट्टी असुनही दिवाळीत रस्त्यांवर पडलेला पालिकेकडून उचलला होता. हा कचरा नीट उचलला जात आहे की नाही हे तपासण्यासाठी आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी टाकण्यात आली होती. या अधिकाऱ्यांवर स्वता उपायुक्त पाटील नियंत्रण ठेऊन होते. सण असुनही उपायुक्त पाटील सकाळी, रात्री शहराच्या विविध भागात फेरी मारून नियमित स्वच्छता केली जाते की नाही याची पाहणी करत होते.

सर्वाधिक कचरा मोठे गृहप्रकल्प, सोसायट्यांच्या बाहेरील रस्ता, रस्ता दुभाजक आणि चौकांमध्ये आढळून आला. फटाक्यांचा कागदी कचरा, जळलेल्या सुतळी दोऱ्या, फटाक्यांवरील प्लास्टिक आवरणे असा एकूण १४ टन कचरा जमा करण्यात आला. हा कचरा बारावे कचराभूमीवर नेऊन त्याच्यावर विल्हेवाटीची शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल, असे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा-दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात १५ ठिकाणी आगीच्या घटना; फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे आग लागल्याची शक्यता

वेळेचे बंधन झुगारले

पालिका, पोलिसांनी रात्री आठ ते १० या दोन तासाच्या वेळेत नागरिकांना फटाके फोडण्याचे आवाहन केले होते. या आदेशाकडे दुर्लक्ष करून कल्याण डोंबिवलीतील काही भागात रात्री १२ वाजल्यानंतरही फटाके फोडले जात होते. फटाक्यांच्या धुरांचे धुरके शहरात तयार झाले होते.

“ दिवाळी सणाच्या तीन दिवसांच्या काळात पालिका हद्दीतून एकूण १४ टन फटाक्यांचा कचरा जमा करण्यात आला. या कचऱ्यावर बारावे प्रकल्पात विल्हेवाटीची प्रक्रिया केली जाणार आहे.” -अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 tons of firecracker waste accumulated in three days in kalyan dombivli mrj
Show comments