कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी रुग्णालयातील सफाई कामगाराला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीने पीडित तरुणीचे हात बिछान्याला बांधून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. कळवा रुग्णालय ठाणे महापालिकेतर्फे चालवले जाते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
आरोपी दीनेश कोळीला (३९) पोलिसांनी अटक केली असून तो कोपरी येथे राहतो. शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. शेजारच्या बिछान्यावर झोपलेल्या एका सर्तक महिला रुग्णाने आपल्या मुलीला बलात्कारापासून वाचवले असे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले. पीडित मुलगी कल्याण येथे राहणारी असून ती १६ डिसेंबरपासून कळवा रुग्णालयात उपचार घेत आहे.
पीडित मुलीच्या बिछान्याजवळ सफाई कामगाराची हालचाल सुरु होती. त्यामुळे शेजारच्या बिछान्यावर झोपलेल्या महिलेला संशय आला. जेव्हा तिने आरोपीला याबद्दल विचारले. तेव्हा त्याने तिला उडवून लावले. त्यानंतर या महिलेने आरडाओरडा सुरु केल्यानंतर नर्स आणि अन्य कर्मचारी तिथे गोळा झाले. त्यांनी आरोपीला चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. घडल्या प्रकाराबद्दल तुम्ही प्रसारमाध्यमांकडे वाच्यता करु नका अशी आपल्याला रुग्णालयाकडून विनंती करण्यात आली होती असे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले. आरोपी सफाई कामगार हा कंत्राटी कर्मचारी आहे.