बदलापूर : येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेतील शिक्षकांनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या शालेय सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूरातील एका खासगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने लैगिंक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता.
यानंतर संपूर्ण राज्यभरात उद्रेकाची लाट उसळली होती. या घटनेला काही महिने उलटत नाही तोच शिक्षकानेच आपल्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनायभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे. या शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षक मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. या शिक्षकाने ५ फेब्रुवारी रोजी बुधवारी त्याने असभ्य वर्तन करीत या विद्यार्थिनीचा विनयभंग केला.
या संपुर्ण घटनेची माहिती विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी फिर्याद नोंदविली. त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी पॉक्सो व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या शिक्षकाला अटक केली आहे. यामुळे संपूर्ण शहरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांशी संपर्क साधला. यातील शिक्षकाविरोधात पोलिसांच्या माध्यमातून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ठाणे</p>