ठाणे: राज्य शासनाने दिलेल्या ७५ कोटींच्या निधीतून शहरातील उद्यानांच्या नुतनीकरणाचा पालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये शहरातील एकूण १४४ उद्यानांचा समावेश करण्यात आला आहे. या उद्यानांचे नुतनीकरण करून त्यांना नवी झळाळी देण्यात येणार आहे. शिवाय, नुतनीकरणानंतर उद्यानांची दुरावस्था होऊ नये यासाठी निगा, देखभालीकडे विशेष लक्ष देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे शहरातील अनेक उद्यानांची दुरावस्था झाली आहे. यामुळे ठाणेकरांना विरंगुळा आणि मनोरंजनाच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. या उद्यानांच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला होता. त्यासाठी एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत पालिकेने प्रस्ताव तयार केला होता. या कामांसाठी ६० कोटींचा निधी देण्याची मागणी पालिकेने राज्य शासनाकडे केली होती. ती मागणी राज्य शासनाने मान्य केली आहे. करोना काळापासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिकेला राज्य सरकारने रस्ते, सुशोभिकरण, कळवा रुग्णालयाचे सक्षमीकरण आणि महापालिका मुख्यालय इमारत उभारणीपाठोपाठ उद्याने विकसित करण्यासाठी ७५ कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या ठाण्यातील उद्यानांचे रुप पालटण्याची चिन्हे असून त्याचबरोबर ठाणेकरांना मनोरंजन आणि विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा… रेल्वेच्या पारसिक बोगद्याला धोका; कचरा आणि अतिक्रमणांचा विळखा
राज्य शासनाकडून हा निधी मिळताच या उद्यानांची कामे नेमकी कशी करायची आणि ती दर्जेदार व्हावीत, याचे नियोजन आखण्याचे काम आयुक्त बांगर यांच्या देखरेखीखाली सुरू होती. शहरातील उद्यानांचा पालिका प्रशासनाने आढाव घेऊन त्याची यादी तयार केली होती. या यादीनुसार चार गटात उद्यानांचे वर्गीकरण करून त्यांचे नुतनीकरण करण्याचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. या उद्यानांमध्ये मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था तैनात करणे, पाणी आणि शौचालयांची व्यवस्था निर्माण करणे, उद्यानातील कचऱ्याची तेथेच विल्हेवाट लावून त्यापासून खत तयार करणे अशी कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका आयूक्त अभिजीत बांगर यांनी उद्यान विभागाची नुकतीच बैठक घेऊन त्यात १४४ उद्यानांच्या नुतनीकरणासाठी तयार केलेल्या आराखड्याची माहिती घेतली. तसेच या उद्यानांची दूरूस्ती केल्यानंतर त्याची निगा व देखभाल ठेवण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येऊ शकतात, याचाही आढावा घेतला.
अ ,ब, क आणि ड या चार गटात उद्यानांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात अ गटात चांगल्या स्थितीत असलेल्या उद्यानांचा समावेश असून अशा उद्यानांची संख्या २५ इतकी आहे. ब गटात काही प्रमाणात सुधारणा करण्याची गरज असलेल्या उद्यानाचा समावेश करण्यात आला असून अशा उद्यानांची संख्या ४५ इतकी आहे. क गटात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि सुधारणा करण्याची गरज असून अशा उद्यानांची संख्या ४४ आहे. तर ड गटात ज्या उद्यानांची कामे सुरु आहेत, त्यांचा समावेश करण्यात आला असून अशा उद्यानांची संख्या १८ इतकी आहे. या उद्यानांची निगा देखभाग संबधींत ठेकेदाराला पूढील तीन वर्षांसाठी देण्याचे प्रयोजन आहे. तर उर्वरीत उद्यानांची निगा देखभाल पालिका स्वत:च करणार आहे. याशिवाय, दहा ठिकाणी उद्यानांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली.