लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मोठी-मोठी गृहसंकुले उभी राहत असून या संकुलांमध्ये वाहिनीद्वारे गॅस पुरवठा केला जात आहे. अशाचप्रकारे आता शहरातील आणखी १५ इमारतींना पावसाळ्यापुर्वी गॅस जोडणी दिली जाणार आहे.
ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महानगर गॅसच्या अधिकारी आणि विविध गृह संकुलातील रहिवाशांची नुकतीच एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के. एन, आकाश जाधव, आकाश गवळी, निलेश कोळी, सचिन शिनगारे, राकेश जैन, रवी रेड्डी यांच्यासह गृहसंकुलातील नागरिक उपस्थित होते. ठाण्यातील खारकर आळी, माजिवडा, चरई, कोळीवाडा या भागातील गॅस जोडणीबाबत तसेच महानगर गॅसच्या सुरु असलेल्या कामाबाबत, नवीन गॅस जोडणी बाबत आमदार केळकर यांनी आढावा घेतला. या बैठकीत शहरातील आणखी १५ इमारतींना पावसाळ्यापुर्वी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत केळकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संजय केळकर यांनी सांगितले, दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्याला नागरिक, महानगर गॅस अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक घेत असतो. या बैठकीत महानगर गॅस कंपनीच्या प्रलंबित कामांचा आणि नवीन सुरु करण्यात येणाऱ्या कामांचा आढाव घेण्यात येतो. गेल्या दोन वर्षात ठाण्याच्या विविध भागातील ४ हजार ९९२ सदनिकाधारकांना महानगर गॅस जोडणी देण्यात आली आहे.
ठाणे शहराचे नागरीकरण वाढत आहे, इमारतींचा पुनर्विकास होत आहे, नवीन इमारती वाढत आहेत आणि दुसरीकडे घोडबंदर ही विकसित होते आहे. विकासक इमारती बांधून निघून जातात परंतु त्यानंतर तेथील रहिवाशांना आवश्यक बाबींकरिता झगडत राहावे लागते. त्यापैकी गॅस जोडणीच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही अशा बैठका घेऊन लाखो लोकांना कसा लाभ मिळेल हे बघत असतो. तसेच आता पावसळ्यापूर्वी १५ इमारतीना गॅस जोडणीचे काम पूर्ण होईल, असे केळकर यांनी सांगितले.
जरिमरी पोलीस वसाहत आणि टॉवरमध्ये राहणाऱ्या पोलीस कुटुंबियांना मोफत वाहीनीद्वारे गॅस जोडणी करून द्यावी अशी मागणी निलेश कोळी यांनी केली. तसेच या बैठकीदरम्यान त्यांनी तसे निवेदनही दिले. त्यावर तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन लवकरात लवकर सकारात्मक कारवाई करू असे महानगरच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.