कल्याण: आपल्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे सोन्याचे १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तक्रादार महिलेच्या मावस बहिणीला मानपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. तिच्याकडून सोन्याचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.
लोढा पलावा डाऊन टाऊन संकुलात राहणाऱ्या प्रिया रवि सक्सेना आणि सीमरन पाटील या मावस बहिणी आहेत. प्रिया सक्सेना या गुरुवारी आपल्या कामानिमित्त नवी मुंबईत कामोठे येथे गेल्या होत्या. प्रवास सुरू होण्यापूर्वी आरोपी सीमरन पाटील यांनी चलाखीने प्रिया यांच्या पर्समधून त्यांच्या घराची चावी, तिजोरीची चावी आणि दरवाजा उघडण्याचे ओळख कार्ड काढून घेतले.
हेही वाचा >>> ठाणे : टोरंट पाॅवर वीज थकबाकीदारांची भामट्यांकडून आर्थिक फसवणुक
प्रिया नवी मुंबईत कामोठे येथे गेल्याची खात्री पटल्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपी सीमरन प्रिया यांचा पेहराव करुन प्रियाच्या लोढा पलावा येथील घरी आली. चेहरा सोसायटी किंवा परिसरातील सीसीटीव्ही मध्ये दिसू नये म्हणून चेहऱ्या भोवती ओढणीचा पट्टा बांधून घेतला. रिक्षेने ती प्रियाच्या घरी आली. रखवालदाराला प्रिया नेहमीप्रमाणे घरी आली असे वाटले. चावीने दरवाजा उघडून तिजोरातील १५ लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन सीमरनने पळ काढला. संध्याकाळी प्रिया घरी आल्यानंतर त्यांना तिजोरीत सोन्याचे दागिने नसल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
हेही वाचा >>> फेब्रुवारीपासून मानखुर्द-ठाणे प्रवास केवळ पाच मिनिटांत
सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सीमरनला पहिले तपासासाठी ताब्यात घेतले. चौकशी करताना सीमरनने प्रियाच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तारमळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.