डोंबिवली- येथील देवीचापाडा भागातील सातपुलावर मंगळवारी संध्याकाळी मोठागाव मधील दोन तरुणांना याच भागातील १५ जणांच्या २० ते २५ वयोगटातील तरुणांच्या गटाने लाथाबुक्की, दारुच्या बाटल्या डोक्यात मारुन बेदम मारहाण केली. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी तरुणावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अभिषेक शिवदास भोईर (२२, रा. शंकर प्लाझा, मोठागाव), ओमकार माळी अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. अभिषेकच्या तक्रारीवरुन पोलिसांनी १५ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिवशाहीला कार धडकून भीषण अपघात; ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपक मोरे यांचं निधन

सचिन म्हात्रे, प्रथम भोईर, महेश चाटसे, राम्या म्हात्रे, लाल्या म्हात्रे, सुसते आंबेकर आणि इतर आठ जण अशी आरोपी तरुणांची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले, तक्रारदार अभिषेक आणि त्याचे पाच मित्र प्रेम भोईर, ओमकार माळी, जयदीप भोईर,आकाश डबाले, अनिकेत कुड, प्रतिक भोईर (रा. मोठागाव) मंगळवारी दुपारी कामानिमित्त सातपूल रेल्वे पुलावरुन पायी पिंपळास भागात गेले होते. संध्याकाळी ते परत घरी येत असताना सातपूल रेल्वे पुलावर बाल्कनीत आरोपी उभे होते. त्यांनी अभिषेक यांच्या मित्रांजवळ येऊन ‘आम्ही या भागाचे भाई आहोत. तडीपारी भोगून आलो आहोत.’ आम्हाला ओळखले नाही का, असे बोलून पुलावरच अभिषेकसह त्याच्या मित्रांसह शिवीगाळ मारहाण सुरू केली. राम्या, सचिन यांच्या पुढाकारातून अभिषेक याला रेल्वे मार्गात पाडून दगड, लाथांनी मारहाण करण्यात आली. ओमकार मध्ये पडला तर त्यालाही मारहाण झाली. अभिषेकचे इतर मित्र हा प्रकार बघून तेथून पळाले. अभिषेक, ओमकार आरोपींच्या तावडीत सापडल्याने त्यांना ठार मारण्याची भाषा प्रथम भोईर, सचिन म्हात्रे बोलत होते. अभिषेकच्या डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. मारहाणी नंतर आरोपी पळून गेले. अभिषेकच्या मित्रांनी त्याला विष्णुनगर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांच्या सूचनेवरुन त्याला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 people brutally assault youth between 20 to 25 age of dombivli on the railway bridge zws