कल्याण : टिटवाळा येथील बनेली परिसरातून एक १५ वर्षाची अल्पवयीन शाळकरी मुलगी बुधवारी राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. या मुलीच्या आई, वडिलांनी आपले नातेवाईक, घर परिसरात खूप शोध घेतला पण ती आढळून आली नाही. त्यामुळे मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय घेत कुटुंबीयांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.मुलीच्या आईने टिटवाळा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आम्ही पती, पत्नी, आमची तीन मुले टिटवाळा बनेली भागात राहतो.

आमची १५ वर्षाची मुलगी टिटवाळा भागातील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी तिची तब्येत ठिक नव्हती. म्हणून ती शाळेत गेली नाही. मुलीचे वडील टॅक्सी चालक आहेत. मी स्वता मुंबईतील आस्थापनेत खासगी नोकरी करते.बुधवारी अकरा वाजेपर्यंत मुलगी घरात होती. दुपार दोन नंतर मुलीचे वडील घरी आले. तेव्हा घराच्या दरवाजाला कुलूप होते. म्हणून त्यांनी आपल्या मुलीला संपर्क केला. तिने प्रतिसाद दिला नाही. मुलगी प्रतिसाद देत नाही म्हणून आई, वडिलांनी टिटवाळा, बनेली परिसरात, आपल्या नातेवाईक, मुलीच्या मैत्रिणींकडे तपास केला. ती कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेला असल्याचा संशय व्यक्त करत मुलीच्या आईने टिटवाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. मुलगी हिंदी भाषिक आहे. तिच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाईल आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी गु्न्हा दाखल करून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेतील शिळफाटा भागात एका घरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. डोंबिवली, कल्याण परिसरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम गृहसंकुल भागात एका रिक्षा चालकाने एका बालकाचे खंडणीसाठी अपहरण केले होते. मानपाडा पोलिसांनी शिताफीने तपास करून तीन तासाच्या आत बालकाची अपहरणकर्ता रिक्षा चालकाच्या तावडीतून बालकाची शहापूर परिसरातून सुटका केली होती. दोन कुटुंबीयांमधील घरघुती वादातून मुलांना लक्ष्य केले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

टिटवाळा परिसरात बेकायदा चाळींमध्ये स्वस्तात घर मिळत असल्याने मुंबई परिसरातील झोपड्या, चाळींमधील रहिवासी याठिकाणी कायमस्वरुपीसाठी निवासासाठी दाखल झाले आहेत. घरासमोरील जागेचे वाद आणि किरकोळ विषयांवरून त्यांच्यात भांडणे होतात. त्याचा राग मुलांवर काढण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.