कल्याण : शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्यावर, पर्यायी रस्ते मार्गावर १५० वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात होण्यास सुरूवात झाली आहे. जागोजागी वाहतूक पोलीस, सुरक्षा जवानांनी जड, अवजड वाहन चालकांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यास सुरुवात केली आहे. शिळफाटा रस्त्यावर येण्यापूर्वीच वाहन चालकांना रोखून त्यांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिळफाटा रस्त्यावरील कोंडीत अडकण्यापेक्षा अनेक जड, अवजड वाहन चालकांनी पर्यायी रस्ते मार्गाने जाण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकळी मुंब्रा बाह्यवळण रस्ता येथे तेलवाहू वाहनाला अपघात झाल्याने त्याचा परिणाम शिळफाटा रस्त्यावर झाला होता. या रस्त्यावर, पर्यायी रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक ते दीड तास प्रवासी वाहतूक कोंडीत अडकून पडले होते.

निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी पलाव चौक बंद ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी वाढीव १५० वाहतूक पोलीस, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शिळफाटा रस्त्यासह डोंबिवली, कल्याणमधील एकूण आठ पर्यायी रस्ते मार्गावर तैनात असणार आहे. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी बुधवारी सकाळपासूनच शिळफाटा रस्त्यावरील जड, अवजड वाहतूक कमी होईल यादृष्टीने नियोजन सुरू केले. शिळफाटा रस्त्यावर ज्या फाट्यांवरून जड, अवजड वाहने येत होती. तेथेच त्यांना मज्जाव करून पयार्यी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. बहुतांशी वाहन चालक, हलक्या मोटारींचे वाहन चालक शिळफाटा रस्त्यावरील कोंडीच्या भीतीने पर्यायी रस्ते मार्गाने प्रवास करू लागले. त्यामुळे बुधवारी दुपारनंतर शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या रोडावू लागली. या रस्त्यावरील हलकी वाहने सुसाट प्रवास करताना दिसत होती.

निळजे रेल्वे उड्डाण पुलावरील कामाचा वेग वाढेल. त्यावेळी नवी मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांशी हलक्या वाहनांना काटई चौकातून खोणी तळोजा मार्गे जाण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणार आहेत. पलावा चौकाकडे जाणारी मार्गिका खुली राहणार असली तरी ही मार्गिका पलावा, लोढा, रिव्हरवुड पार्क, काटई, निळजे परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या प्रवासासाठी मोकळी राहील यादृष्टीने वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत. या रस्त्यावरून कल्याण, बदलापूरकडून येणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात येणार आहेत. या भागातील अनेक विद्यार्थी पलावा वसाहतीमधील शाळेत जातात. त्यांची गैरसोय होऊ नये. या भागातील शाळा पाच दिवस नियमित सुरू राहाव्यात. त्यांना कोंडीचा फटका बसू नये यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्नशील असतील, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले.