मुंबई : राज्यातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकारग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असून धक्कादायक बाब म्हणजे मनोरुग्णांची संख्याही फार मोठी असल्याचे आरोग्य विभागातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात दोन आठवड्यापूर्वी केलेल्या मानसिक आजाराविषयक तपासणीत तब्बल १५७ कैद्यांना मानसिक आजार असल्याचे आढळून आले असून गंभीर बाब म्हणजे या रुग्णांसाठी पुरेशी व आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले आहे. ठाणे कारागृहात काही कैद्यांना साखळदंडाने बांधून ठेवले असल्यास ते मनोविकार तज्ज्ञांना येत्या ९ मे रोजीच्या मानसिक आरोग्य शिबीरात दाखविण्यात यावे, असे पत्रच ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी तुरुंग अधिकाऱ्यांना दिले आहे.

महाराष्ट्रात एकूण ६० कारागृहे असून यामध्ये नऊ मध्यवर्ती, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे तर एक खुले महिला कारागृह आहे. या सर्व कारागृहांची एकूण क्षमता २४ हजार ७२२ इतकी असून जानेवारी २०२३ अखेरीस या कारागृहात एकूण ४१ हजार ७५ बंदी होते. यामध्ये ३९ हजार ५०४ पुरूष तर १५५६ महिला आणि १५ तृतीयपंथी कैद्यांचा समावेश आहे. राज्यातील सर्व कारागृहात क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त कैदी असून प्रामुख्याने यात मुंबई, ठाणे, येरवडा आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहांचा समावेश आहे. मुंबईतील कारागृहात क्षमतेपेक्षा ३२५ टक्के अधिक तर ठाणे कारागृहात २८८ टक्के, येरवडा येथे १८० टक्के आणि नागपूर कारागृहात ५६ टक्के क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात काही आमदारांनी मांडला होता. वेगवेगळ्या तुरुंगातील कोठडीत क्षमतेपेक्षा जास्त कैदी व त्यांना योग्य त्या आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक कैद्यांना त्वचाविकारांचा त्रास होतो तसेच मानसिक आजारांचाही त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे तुरुंगातील तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Three and a half thousand seats reserved in 153 schools for RTE admission in Vasai news
वसईत आरटीई  प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
Eight minor girls escape from Ulhasnagar government observation home
उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातील आठ अल्पवयीन मुली पळाल्या

ठाणे मध्यवर्ती तुरुंगातील रुग्णांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी दर मंगळवारी ठाणे जिल्हा रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ सुवर्णा माने या जात असतात. साधारणपणे दर मंगळवारी २५ ते ३० मनोरुग्ण कैद्यांना तपासून त्यांच्या गरजेनुसार औषधोपचार करण्यात येतो. एप्रिलमध्ये ठाणे जिल्हा रुग्णालयाने तुरुंगात आयोजित केलेल्या शिबिरात तब्बल १५७ कैद्यांवर मानसिक आजारासाठी औषधोपचार करण्यात आले. या कैद्यांना नियमितपणे काही विशिष्ठ औषधे द्यावी लागत असून गेले काही महिने या औषधांचा रुग्णालयात तुटवडा असल्याचे दिसून आले आहे. औषधे न मिळाल्यास हे कैदी अस्वस्थ होऊन आरडाओरडा करतात वा प्रसंगी हिंसकही होतात. यातूनच त्यांना गरज असलेले औषध नसल्याने अन्य औषधे देण्यात येतात, असे गंभीर निरीक्षण ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवले आहे. मात्र याबाबत विचारणा करूनही थेट बोलण्यास कुणी तयार नाही.

यातील बहुतेक कैदी हे अंमली पदार्थांचे सेवन करणारे असून तुरुंगात त्यांना अंमली पदार्थ मिळू शकत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे लागतात. त्यांच्यावर मानसिक औषधोपचार केल्यानंतर हे कैदी शांत होतात. तथापि काही प्रकरणात तीव्र औषधे दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तुरुंग विषयक नियमानुसार दाखल होणाऱ्या प्रत्येक कैद्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करणे बंधनकारक असते. तथापि अशा प्रकारची तपासणी करण्यासाठी पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा अशी तपासणी होत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ठाणे कारागृहात सुमारे ६०० हून अधिक महिला कैदी असून त्यापैकी शंभरहून अधिक महिलांना मानसिक आजारांसाठी औषधोपचार सुरु आहेत. यातील अनेक महिला नैराश्यग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. महिलांच्या कोठडीत सहा ते आठ महिला कैदी असतात. अपुरी जागा व अस्वच्छता यामुळे झोप न लागण्याचाही त्रास अनेक महिलांना आहे. या कारागृहात काही मनोरुग्ण कैदी बेफाम होत असल्यामुळे त्यांना साखळदंडाने बांधल्याची तक्रार असल्यामुळे असे रुग्ण असल्यास तपासणीत दाखविण्याची मागणी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णालय प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे. येत्या ९ मे रोजी होणाऱ्या मानसिक आरोग्य शिबीरात साखळदंडाने बांधलेले तसेच मनोरुग्णालयात भरतीची आवश्यकता असणारे रुग्ण मानसोपचारतज्ज्ञांना दाखविण्यात यावे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून त्यासाठी नवीन तुरुंग बांधण्याचे काम हाती घेतले आहे. कैद्यांच्या आरोग्याच्या प्रश्नातही आपण लक्ष घालणार आहे. रुग्णांच्या मानसिक आजार तसेच अन्य आजारांविषयी संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. तसेच रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नांची योग्य ती काळजी घेतली जाईल.

राज्यातील सर्वच तुरुंगातील कैद्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक आजाराच्या ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे त्यांना तसे दाखल करण्यात येईल. तसेच मनोरुग्णांसाठी पुरेशी औषधे असतील याची काळजी घेतली जाईल. मनोरुग्णांना साखळदंडाने बांधले जात नाही, मात्र याबाबतची माहिती घेतली जाईल. एकूणच तुरुंगातील आरोग्य व्यवस्थेचा व गरजांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. – अमिताभ गुप्ता , अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग व सुधार)

Story img Loader