ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १२ तासांत म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत. यावर आता रुग्णालयाचे डीन राकेश बारोट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बारोट यांनी संबंधित रुग्णांच्या मृत्यूची कारणंही सांगितली आहेत.
एकाच रात्री १६ रुग्णांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण देताना रुग्णालयाचे डीन राकेश बारोट म्हणाले, “मृतांमध्ये एक चार वर्षांचा मुलगा होता. त्याने मोठ्या प्रमाणात रॉकेल प्यायलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. बाकीचे काही रुग्ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी तीन दिवस तर कुणी चार दिवसांपासून उपचार घेत होते.”
“एका रुग्णाच्या डोक्याला मार लागला होता. या अज्ञात रुग्णाचाही मृत्यू झाला. तर अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा होता, त्यांचाही मृत्यू झाला. दोन रुग्णांची फुफ्फुसं खराब होती. त्या रुग्णांना संसर्ग होऊन मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झालं होतं. कुणाला हृदयाची समस्या होती, तर कुणाला अनियंत्रित मधूमेह होता. अशा रुग्णांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया डीन राकेश बारोट यांनी दिली.
हेही वाचा- कळवा रुग्णालयात १२ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू; शेवटच्या क्षणी दाखल केल्याचा प्रशासनाचा दावा!
“आम्ही ५०० बेडच्या रुग्णालयात जवळजवळ ६०० रुग्ण अॅडमिट केले आहेत. येथील डॉक्टर्स २४-२४ तास काम करत आहेत. आम्ही शक्यतो कोणत्याही रुग्णाला परत पाठवत नाही. इकडे येणारा प्रत्येक माणूस गरीब किंवा आदिवासी असतो. ते अनेकदा अत्यावश्यक स्थितीत येतात. ते कसल्याही स्थितीत आले तरी आम्ही त्यांच्यावर उपचार करतो”, असंही बारोट म्हणाले.