तब्बल १६० वर्षांपूर्वी ठाणे शहरामध्ये टपाल विभागाचे पहिले कार्यालय सुरू झाले. पुढील काळात ठाणे शहराच्या विविध भागांत एकूण सात टपाल कार्यालये कार्यान्वित झाली. शहरातील अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये टपाल कार्यालये सुरू करून शहरातील संपर्काचा एक मजबूत दुवा तयार झाला होता. मात्र संगणकीय युगात संपर्क यंत्रणेत झालेल्या आमूलाग्र बदलामुळे परंपरागत संदेशवहन करणाऱ्या टपाल कार्यालयांकडे काहीसे दुर्लक्ष झाले. टेलिग्राम कालबाह्य़ झाले आणि पत्रांचाही ओघ घटला. असे असले तरी अजूनही शहरातील अनेक नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी नियमितपणे टपाल कार्यालयात यावे लागते. सरकारी पत्रव्यवहार, ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी, बँकिंगच्या सुविधा आणि नव्याने दाखल झालेले ई-कॉमर्स या सगळ्या गोष्टींनी टपाल कार्यालयांची उपयुक्तता जराही कमी केली नाही. त्यामुळे ईमेल आणि इंटरनेटवरील समाज माध्यमांमध्ये रमलेल्या तरुणांनाही ई-कॉमर्स कंपनीच्या खरेदीनंतर त्या वस्तू मिळवण्यासाठी पोस्टमनकाकांची वाट पाहावी लागते. टपाल कार्यालयाने आपला कार्यविस्तार केला असला तरी टपाल कार्यालयाच्या इमारतींमध्ये मात्र कोणत्याही प्रकारच्या अत्याधुनिकीकरणाचा लवलेशही नाही. अनेक जुन्या भाडय़ाच्या इमारतींमध्ये टपाल कार्यालये भरत असून त्यासुद्धा मोडकळीस येऊ लागल्या आहेत. कागदपत्रांचे गठ्ठे, पार्सलचे ढिगारे असे दृश्य प्रत्येक टपाल कार्यालयांमध्ये कायम आहेत. ग्राहक म्हणून येणाऱ्या नागरिकांवर डाफरणारे कर्मचारी हे दृश्य प्रत्येक टपाल कार्यालयात आवर्जून दिसते. ठाण्यातील टपाल कार्यालयांमध्येही हे चित्र कायम असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
दमानिया इस्टेट
ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणाऱ्या सर्वाधिक खातेदारांचे खाते या टपाल कार्यालयात असून येथील दयनीय अवस्थेमुळे त्यांना फार त्रास सोसावा लागत आहे. कमी कर्मचारी असल्याने आम्हाला तात्काळ सेवा देता येत नाही, हे येथील प्रत्येक टपाल कर्मचाऱ्याचे ठरलेले उत्तर. टपाल सेवेच्या संगणकीकरणाच्या कामामुळे टपाल कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा ठप्प झाल्यानंतर येथे येणाऱ्या नागरिकांना मोठय़ा गैरसोयीला तोंड द्यावे लागले. आपल्याच हक्काचे पैसे आपल्याला मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. अशा वेळी ग्राहकांना दिलासा देण्यात येथील कर्मचारी पूर्णत: अयशस्वी ठरले. अनेक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी वाद घातले. उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे ग्राहकांच्या मनात टपाल कार्यालयाविषयी असलेल्या वर्षांनुवर्षांच्या विश्वासालाच तडा गेला.
ठाणे रेल्वे स्थानक परिसर
शासनाच्या विविध परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना टपालाच्या माध्यमातून पैसे भरावे लागतात. त्यासाठी चलन भरण्याची गरज असते. वेगवेगळ्या विद्यापीठांच्याही काही परीक्षांसाठी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पोस्टाची वाट धरावी लागते. मात्र ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य कार्यालय नेहमीच समस्यांनी ग्रस्त असल्याने येथे येणाऱ्यांना नेहमीच गैरसोय होत असते. अनेकवेळा रांगा वाढल्यानंतर या रांगा टपाल कार्यालयाबाहेर येते. त्यामुळे परिसरातील रस्ते आणि पदपथ तुडुंब भरून जातात. एखादी खिडकी अचानक बंद करून नागरिकांना ताटकळत बसावे लागते. याविषयी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कुणीही अधिकारी तयार नसतो. त्यामुळे आम्ही नेमके जाणार कुठे असा प्रश्न ग्राहकांचा असतो.