ठाणे पोलिसांनी नववर्ष स्वागत आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यववस्था आबाधित राखण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री चार तास ऑलआऊट मोहिम हाती घेतली होती. या चार तासांच्या कारवाईत पोलिसांनी १६६ जणांना अटक केली. तसेच १४० मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली. १ हजार ५०० हून अधिक वाहन चालकांविरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात ११ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला आहे.
हेही वाचा- ठाणे : अर्थसाक्षरतेसाठी डोंबिवलीतील ‘जन गण मन’ शाळेत विद्यार्थी चालविणार बँक
नववर्ष स्वागतापूर्वी हुल्लडबाजांकडून नववर्षाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेपर्यंत ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ऑलआऊट मोहिम हाती घेतली होती. या कारवाईत २३४ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७० कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिसांकडून ढाबे, उपाहारगृहे, डान्सबार, पब, हुक्का पार्लर यांची तपासणी करण्यात आली. तसेच अभिलेखावरील गुन्हेगार, कुख्यात गुंडांना नोटीस बजावण्यात आल्या. पोलिसांनी विविध प्रकरणात १६४ गुन्हे दाखल केले. तसेच १६६ जणांना अटक केली.
हेही वाचा- ठाणे : मुंब्रामध्ये दोन दिवसांत दोघांची हत्या तर एकजण गंभीर
तर, वाहतूक शाखेने वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईत पोलिसांनी १४० मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर, विना परवाना वाहने चालविणे, रिक्षा चालविताना गणवेश परिधान करण्यास टाळणे, विना शिरस्त्राण दुचाकी चालवणे, लाल रंगाचे सिग्नल ओलांडणे, चारचाकी चालविताना आसन पट्टा वापण्यास टाळणे, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणाऱ्यां १ हजार ६५० जणांविरोधात कारवाई केल्या. पोलिसांनी त्यांना ११ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला आहे.
हेही वाचा- कल्याणमध्ये रिक्षा चालकाला वाडेघरच्या तरुणांची बेदम मारहाण
१६६ जण अटकेत
या चार तासांच्या कारवाईत पोलिसांनी १६६ जणांना अटक केली. त्यामध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगणारे पाच, हद्दपार नियमाचे उल्लंघण करणारे १२, अवैध अस्थापना ५२, अवैध दारू ५२, अमली पदार्थ बाळगणे २०, अजामिनपात्र नोटीस नऊ, इतर गुन्हे १६ अशा १६६ जणांचा सामावेश आहे.