कल्याण: टिटवाळा बनेली टेकडीवर टेकड्या खोदुन पावसाळा सुरू होताच बेकायदा चाळी उभारणीसाठी भूमाफियांनी १६७ सीमेंट काँक्रीटची जोती, काही ठिकाणी बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू केली होती. या भागात दोन महिन्यापूर्वी कारवाई करूनही भूमाफियांनी पुन्हा बनेली टेकडीवर बेकायदा बांधकामे सुरू केल्याचे समजताच मंगळवारी सकाळी दोन जेसीबींच्या साहाय्याने तोडकाम पथक घेऊन अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी बनेली टेकडीवरील १६७ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली.
अचानक तोडकाम पथक बनेली टेकडीवर येऊन कारवाई करू लागल्याने बांधकामाच्या ठिकाणी काम करत असलेले मजूर, गवंडी आणि तेथील मुकादम बांधकाम साहित्य टाकून घटनास्थळावरुन आजुबाजुच्या झाडाझुडपे, नागरी वस्तीत पळून गेले. काही वेळाने काही भूमाफिया विरोध करण्यासाठी पुढे आले पण पोलिसांनी त्यांना हाकलून लावले. गेल्या दोन महिन्यापूर्वी टिटवाळा बनेली भागातील सुमारे तीनशेहून अधिक बेकायदा चाळींची, जोत्यांची बांधकामे अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने साहाय्यक आयुक्त पाटील यांच्या उपस्थितीत तोडून टाकली.
बनेली टेकडी भागात कोणी फिरकणार नाही, असा विचार करून भूमाफियांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच चाळी, व्यापारी गाळ्यांची काही बेकायदा बांधकामे करावीत म्हणून जोत्यांची बांधकामे सुरू केली होती. बनेली भागात भूमाफियांनी पुन्हा बेकायदा चाळी उभारणीसाठी सीमेंट काँक्रिटची जोती उभारण्याची कामे सुरू केली आहेत. काहींना बेकायदा चाळी उभारणीसाठी विटा आणून ठेवल्या आहेत. अशी कुणकुण साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना लागताच त्यांनी पहिले गुप्तपणे या बेकायदा बांधकामांची माहिती दोन दिवसापूर्वी काढली. त्यावेळी अशाप्रकारची बेकायदा बांधकामे बनेली टेकडी भागात टेकडी खोदून सुरू करण्यात आल्याची पक्की माहिती मिळाल्यावर मंगळवारी सकाळीच तोडकाम पथकाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक साहाय्यक आयुक्त पाटील यांनी तोडकाम पथकाला घेऊन बनेली टेकडी गाठली.
पथकाने कसलाही विचार न करता दोन जेसीबींच्या साहाय्याने टेकडीवरील १६७ जोती, नवीन बेकायदा चाळींच्या उभारणीची बांधकामे जमीनदोस्त केली.मागील पाच महिन्यापासून टिटवाळा परिसरात बेकायदा बांधकामांच्या विरुध्द आक्रमकपणे तोडकाम कारवाई सुरू असल्याने भूमाफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. बहुतांशी भूमाफिया राजकीय आशीर्वादाने याठिकाणी यापूर्वी बेकायदा बांधकामे करत होते. परंतु, साहाय्यक प्रमोद पाटील भूमाफियांवर त्यांच्या बेकायदा चाळी तोडून त्यांच्यावरच एमआरटीपीचे गुन्हे दाखल करत असल्याने कोणीही राजकीय नेता पाटील यांना कारवाई रोखण्यासाठी संपर्क करत नसल्याचे समजते.
मागील चार महिन्यांपासून अ प्रभागातील टिटवाळा भागातील सर्व प्रकारची बेकायदा बांधकामे बंद आहेत. बांधकाम सुरू असल्याची कुणकुण लागताच ते बांधकाम तात्काळ जाऊन तोडले जाते. बनेली टेकडीवर पावसाळ्यात बांधकामे करण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर या टेकडीवर १६७ जोती आणि इतर बांधकामे दोन जेसीबींच्या साहाय्याने भुईसपाट केली. – प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.