लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील पूर्व भागातील चार रस्त्यावरील रघुवीरनगर मधील श्रमसंपदा निधी गुंतवणूक कंपनीने ४७ ग्राहकांची गेल्या वर्षभराच्या कालावधीत १७ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या कंपनीतील विविध गुंतवणूक योजनांमध्ये वाढीव व्याजाच्या आमिषाने ग्राहकांनी ही गुंतवणूक केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
डोंबिवलीतील सुनीलनगर, गोपाळबागमध्ये राहणारे परशुराम मेढेकर या ज्येष्ठ नागरिकाची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. मेढेकर यांच्यासह ४७ गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी श्रमसंपदा निधी गुंतवणूक कंपनीच्या संचालकांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा… कल्याण, डोंबिवलीत नाले सफाईचा दुर्गंधीयुक्त गाळ रस्त्यावर
व्यवस्थापक सागर डोंगरे (रा. ओम सावली, कुंभारखाणपाडा, डोंबिवली पश्चिम), संचालक राजेंद्र चोपडे (रा. शिंदे गाव, नायगाव रोड, नाशिक), संचालक भास्कर बिन्नर (नाशिक), संचालक विष्णु दिनकर (अनसोली, ता. मुरबाड, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. फेब्रुवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. डोंबिवली पूर्वेतील रघुवीर नगर, डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्ता, चार रस्त्या जवळ, पाठक इमारतीत श्रमसंपदा निधी कंपनीचे कार्यालय आहे.
हेही वाचा… डोंबिवलीतील अल्पवयीन मुलांची शहाड रेल्वे स्थानकात लोकलमध्ये स्टंटबाजी
पोलिसांनी सांगितले, ४७ गुंतवणूकदारांनी श्रमसंपदा निधी कंपनीत आवर्त ठेव, कायमस्वरुपी ठेव, दैनंदिन ठेव योजनेत गुंतविले होते. या माध्यमातून वाढीव व्याजाचा परतावा मिळण्याचे आश्वासन संचालकांनी गुंतवणूकदारांना दिले होते. ठेव योजनांची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदार आपल्या ठेवी परत मागू लागले. त्यावेळी संचालक विविध कारणे देऊन वेळकाढूपणा करू लागले. नऊ महिने उलटून गेले तरी संचालकांकडून आपली गुंतवणूक रक्कम व्याजासह परत करत नाहीत. ते उडवाउडवीची उत्तरे गुंतवणूकदारांना देऊ लागले. त्यांनी ग्राहकांच्या संपर्काला प्रतिसाद न देण्यास सुरुवात केली. ते आपली फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यावर गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात संचालकांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक, ठेवीदारांचे हित कायद्याने गुन्हा दाखल करुन घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.