डॉ. नरेंद्र जाधव, शेषराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती; ‘डॉ. आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान’ मध्यवर्ती संकल्पना
समरसता साहित्य परिषद आणि श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्था कल्याण पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन कल्याण पूर्वेत करण्यात आले आहे. ३० व ३१ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी, महाड तालुका मराठा समाज हॉलशेजारी, कोळसेवाडी, कल्याण पूर्व येथे हे संमेलन होणार आहे.
उद्घाटन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्ष रमेश पतंगे आणि पूर्व अध्यक्ष शेषराव मोरे उपस्थित राहणार आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान’ हे या साहित्य संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे, अशी माहिती समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह रवींद्र गोळे यांनी दिली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड असणार आहेत.
महाराष्ट्राला साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीची प्रदीर्घ परंपरा असून या परंपरेला समरसता साहित्य परिषदेने नवा आयाम जोडला आहे. १९९८ पासून विषयनिष्ठ अशा या साहित्य संमेलनाची परंपरा निर्माण झाली. याच परंपरेतील कल्याण येथे होणाऱ्या १७ व्या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद, कवी संमेलन, व्याख्याने, युवा संमेलन या कार्यक्रमांचा समावेश आहे. शनिवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन सत्रानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतकेंद्री अर्थचिंतन’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये डॉ. कुमार शास्त्री, राम शिंदे, अंकेश साहू, राजकुमार मस्के उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या परिसंवादामध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रखर राष्ट्रवाद’ या विषयावर डॉ. ईश्वर नंदपुरे, सुनील नेवे, योगिता साळवी, प्रदीप मस्के सहभागी होणार आहेत. तर सायंकाळी सामाजिक कार्यकर्ते विजय सुरवाडे आणि मारुती पवार यांच्या मुलाखती होणार आहेत. रात्री कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी व्याख्यान
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘राज्यघटना नव्या युगाचा धर्मग्रंथ’ या विषयावर प्रा. श्याम अत्रे यांचे व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या दिवशीच्या परिसंवादाचा विषय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आणि परिणाम’ हा असणार आहे. त्यामध्ये प्रा. सर्जेराव ठोंबरे, शिवाजी कांबळे, माया पराते आणि राहुल वाघमारे सहभागी होणार आहेत. तर युवा संमेलनामध्ये डॉ. आंबेडकरांचे उद्योजकीय विचार या विषयावर पद्मश्री मिलिंद कांबळे व्याख्यान देणार आहेत. परिसंवादाच्या शेवटच्या सत्राचा विषय साहित्य परिचय असा असणार असून यामध्ये महाराष्ट्रातील निवडक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा