ठाणे : डोंबिवली येथे एका चार महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून पळ काढलेल्या १७ वर्षीय बांगलादेशी मुलीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. मुलाची देखील पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. मुलाचे वडिल तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याने तसेच आई आणि मावशीला जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याने या प्रकारापासून सुटका करून घेण्यासाठी तिने बाळाचे अपहरण केल्याचे तपासात समोर येत आहे. याप्रकरणाची पुढील कारवाई मानपाडा पोलीस करत आहेत.
डोंबिवली येथे राहणारी बांगलादेशी तरूणी एका चार महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून भिवंडी एसटी थांबा येथे आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस हवालदार अमोल देसाई, माया डोंगरे यांच्या पथकाने एसटी थांब्याजवळ मुलीचा शोध घेतला. त्यावेळी तरूणी बाळासह उभी असल्याचे आढळून आले. पथकाने तात्काळ तिला आणि बाळाला ताब्यात घेतले.
हेही वाचा…दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
तरूणी बांगलादेशी असल्याने तिला हिंदी भाषा समजत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दुभाषीला बोलावून तिने अपहरण का केले याबाबत विचारले. संबंधित मुलाच्या वडिलांनी तिला, तिच्या आईला आणि मावशीला गोदामांमध्ये नोकरी देतो असे सांगून बेकायदेशीररित्या भारतात आणले होते. त्यानंतर त्याने तरूणीला वेश्या व्यवसायात ढकलून दिले. तसेच वेश्या व्यवसाय केला नाही, तर तिच्या आईला आणि मावशीला जीवे मारले जाईल अशी धमकी तो व्यक्ती देत होता. त्याने तरूणीचे अश्लील छायाचित्र आणि चित्रीकरण काढले आहे. ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देखील देत होता. या सर्व प्रकारामुळे तिने मुलाचे अपहरण केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. भिवंडी युनीटच्या पथकाने तरूणीला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मानपाडा पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.