ठाणे, मुंबई, नवी मुंबई पोलीस दलासह इतर काही जिल्ह्यातील १७५ पोलीस निरीक्षकांना अखेर पदोन्नती मिळाली आहे. त्यांची आता उपाधीक्षक किंवा साहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्त किंवा उपाधीक्षक या पदावर वर्णी लागणार आहे. त्यामुळे निवृत्तीच्या उंंबरठ्यावर असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना या बढतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सुमारे वर्षभरापासून हे अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते.
हेही वाचा- बोरीवलीहून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह रायगड, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती येथील १९९१ ते ९३ या बॅचचे सुमारे १७५ पोलीस अधिकारी हे सरळसेवा भरतीने पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. त्यानंतर सुमारे १० ते १५ वर्षानंतर या अधिकाऱ्यांना विविध पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बढती मिळाली होती. नियमानुसार, पोलीस निरीक्षक म्हणून १० वर्ष कालावधी पूर्ण केल्यानंतर बढती मिळून त्यांची साहाय्यक पोलीस आयुक्तपदी किंवा उपाधिक्षक पदी वर्णी लागणे आवश्यक होते. पंरतु प्रशासकीय दिरंगाईमुळे हे अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षात त्यांना पोलीस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्याचे कामकाज पाहण्याची वेळ आली होती.
हेही वाचा- मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपूलावर ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
विशेष म्हणजे, या पोलीस अधिकाऱ्यांना साहाय्यक पोलीस आयुक्तपदी असलेल्या अधिकाऱ्याचे वेतन मिळत आहे. यासंदर्भात काही पोलीस अधिकाऱ्यांनी गृहविभागाकडे पाठपुरावाही केला आहे. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी विभागीय पदोन्नती समितीने (डीपीसी) पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची नावांची यादी गृह विभागास दिली होती. त्यानंतर गृह विभागाने तात्काळ ही यादी सामान्य प्रशासन विभागास दिली होती.अखेर बुधवारी या १७५ अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली असून येत्या काही दिवसांत त्यांना साहाय्यक पोलीस आयुक्त किंवा उपाधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारता येणार आहे. पोलीस दलातून सेवा निवृत्ती मिळण्यापूर्वी साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम करावे. अशी इच्छा होती. ती इच्छा आता पूर्ण होणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.