ठाणे- ग्रामस्थांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पंचायत समिती स्तरावर तालुका सुविधा समिती योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेचे अधिकारी पंचायत समितीत जाऊन ग्रामस्थांच्या शंकांचे निराकरण करत आहेत. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी तालुका सुविधा समितीत १८ तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये योजना, विविध पायाभूत सुविधांसदर्भातील विविध तक्रारींचा समावेश आहे. यातील काही तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले तर, काही तक्रारींचे अंतिम उत्तर एका महिन्याच्या आत देण्यात येईल असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून तालुका सुविधा समिती ही योजना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा उपक्रम पार पडणार आहे. यामध्ये विविध योजना, पायाभूत सुविधांबाबत ग्रामस्थांच्या असलेल्या तक्रारी, जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांच्या लेखी तक्रारी, ग्रामस्तरावर औद्योगिक गुंतवणुक करणाऱ्या उद्योजकांच्या अडचणी निराकरण करण्यासाठीचे निवेदन त्यासह, व्यापारी आणि कामगार वर्गांच्या संघटनांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी देखील या समितीत सोडवल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा पहिला दिवस बुधवारी पार पडला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी पंचायत समिती मुरबाड, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी पंचायत समिती शहापूर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे यांनी पंचायत समिती कल्याण येथे पहिल्या दिवशी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी समजावून घेऊन त्यांच्या अडचणींचे निराकरण केले.

पहिल्या दिवशी तेरा अर्ज दाखल

तालुका सुविधा समिती उपक्रमाच्या पहिल्या दिवशी पंचायत समिती मुरबाड मधून १०, पंचायत समिती शहापूर मधून तीन आणि पंचायत समिती कल्याण मधून पाच तक्रारी असे एकूण १८ तक्रारींचे अर्ज दाखल झाले होते. विविध योजना आणि सुविधांविषयी असलेले प्रश्न यावेळी अर्जाद्वारे नागरिकांनी मांडले होते. तर, जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी यांच्या लेखी तक्रारी, ग्रामस्तरावर औद्योगिक गुंतवणुक करणाऱ्या उद्योजकांचे निवेदनांचाही यात समावेश होता. तसेच अधिकाऱ्यांनी यावेळी व्यापारी व कामगार वर्गांच्या संघटनांशी देखील चर्चा केल्या. यातील काही तक्रारी तातडीने सोडविण्यात आल्या तर, उर्वरित तक्रारींवर महिन्याभरात तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी तक्रारदारांना दिले.