डोंबिवलीः डोंबिवली शहरातील सागाव – मानपाडा रस्त्यावर कोंडीचा केंद्र असलेल्या सोनारपाडा चौकातील कोंडी लवकरच फुटणार आहे. अत्यंत वर्दळीच्या या चौकात लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या भागातील कोंडीमुक्त प्रवासासाठी हा उड्डाणपूल फायदेशीर ठरणार आहे. सागाव मानपाडा रस्त्यावरील सोनार पाडा चौक हा अत्यंत वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. डोंबिवली रेल्वे स्थानकापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर हा चौक असल्याने या ठिकाणी शहराच्या विविध भागातून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. तसेच या ठिकाणी दोन शाळा देखील असल्याने शाळेच्या वेळेत बस मुळे काही अंशी वाहतूक कोंडी देखील होते. त्यामुळे ओघाने वाहनांची संख्या देखील वाढत आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागू नये यासाठी शहरांतर्गत विविध ठिकाणी नव्या रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवली शहरातील सागाव – मानपाडा रस्त्यावरील अत्यंत वर्दळीचे आणि सतत वाहनांनी गजबजलेल्या सोनारपाडा चौकात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे या चौकातील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून या पुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यासाठी मागणी केली होती. तर भाजपा आमदार रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार राजेश मोरे हे देखील या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आग्रही होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
पुलाचा फायदा काय
या पुलाच्या उभारणीमुळे शहरातील स्टार कॉलनी, एमआयडीसी, गांधी नगर या भागात जाणारी वाहने पुलाखालून जातील. तर रेल्वे स्थानकाकडे जाणारी आणि स्थानकाहून येणारी वाहने उड्डाणपुलाच्या साहाय्याने येतील. यामुळे नागरिकांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन तसेच श्रमही वाचणार आहेत.
इतर पुलांसारखी अवस्था नको
डोंबिवलीहून शिळफाटा प्रवासात लागणार पलावा पूल रखडल्याने येथील प्रवाशांना दररोज मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. सातत्याने होणाऱ्या या कोंडीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पलावा पूल कधी पूर्ण होणार माहिती नाही. त्यामुळे नवा जो पूल बांधला जाईल तो वेळेत पूर्ण होईल याची काळजी घ्यावी अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होते आहे. त्यामुळे या पुलाची इतर पुलांप्रमाणे अवस्था होऊ नये अशीही भावना नागरिकांकडून व्यक्त होते आहे.