डोंबिवली : अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून डोंबिवली शहर परिसरातील एकूण सात जणांची एका भामट्याने व्हाॅट्सपवर पाठविलेल्या जुळणी, लघुसंदेशांच्या माध्यमांमधून १८ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात खासगी विमा कंपनीत काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याची फसवणूक झाली असल्याने हा प्रकार उघडकीला आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी एकत्रित तक्रार केली आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. श्रीकांत सुरेंद्र चौधरी यांची ९५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. हेतल अभिषेक अडसुळ यांची दोन लाख ८२ हजार, अक्षता पवार यांची चार लाख ३५ हजार, परमेश्वर शेजारे यांची ९५ हजार, अरविंद मौर्या ८७ हजार रुपये, ज्योती गुप्ता ९० हजार, के. पी. हरदास यांची आठ लाख ८ हजार रुपये अशी फसवणूक झालेल्या नागरिकांची नावे आहेत. विमा अधिकारी हेतल अडसुळ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : मुंबईतील गुटखा तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डकडे? गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचा तपास सुरू

पोलिसांनी सांगितले, डोंबिवली एमआयडीसीतील अभिनव शाळेजवळील सोसायटीत राहत असलेल्या हेतल अभिषेक अडसुळ (२८) या अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनीत सेवा अधिकारी म्हणून नोकरी करतात. त्यांचे पती व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेतल अडसुळ यांना त्यांच्या व्हाॅट्सपवर एक अनोळखी व्यक्तिीने अर्धवेळ नोकरीची एक जाहिरात पाठवली. इच्छुक असल्यास आपण पाठविलेली जुळणी तात्काळ पसंत करा असे त्यात म्हटले होते. हेतल यांनी त्या जुळणीला कळ दाबून पसंती देताच, त्यांना एक युट्युबची जुळणी आली आणि त्या जुळणीला पुन्हा पसंती देण्याचा संदेश त्यात होता.

हेही वाचा >>> वर्धा : साहित्य संमेलनात सहभागी सारस्वतांच्या सुश्रुशेसाठी शंभरावर डॉक्टरांची स्वयंस्फूर्त सेवा

युट्युबवरील जुळणीला पसंती देताच हेतल यांच्या बचत खाते बँक खात्यामधून सुरुवातीला १५० रुपये भामटयाच्या बँक खात्यात वर्ग झाले. त्यानंतर भामट्याने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन हजार रुपये पाठविण्यास हेतल यांना सांगितले. त्यानंतर ३० हजार, ९९ हजार ५०० हजार रुपये अशी रक्कम टप्प्याने भामट्याने हेतल यांच्याकडून परत बोलीच्या नावाने ऑनलाईन माध्यमातून उकळली. व्हाॅट्सवर संदेश पाठविणारा भामटा हा विल्यम असल्याचे हेतल यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला पुन्हा संपर्क करुन जमा केलेली रक्कम परत पाठविण्याची मागणी सुरू केली. मागील ४५ दिवसाच्या कालावधीत रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावुनही भामट्याकडून रक्कम परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हेतल यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात रविवारी संपर्क साधून तक्रार केली. त्यावेळी अशाप्रकारे इतर सहा जणांची फसवणूक झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी सात जणांची एकत्रित तक्रार दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 lakh fraud of seven people by luring them with part time jobs in dombivli ysh