ठाणे : ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रात २०२४ या वर्षभराच्या कालावधीत २३० जणांचा अपघाती मृत्यू तर ६०८ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. मृतांच्या अपघाताची सरासरी केल्यास प्रत्येक महिन्यात किमान १९ ते २० जणांना प्राण गमवाला लागत आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ या वर्षात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. २०२३ मध्ये २०० जणांचा मृत्यू झाला होता.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी हे क्षेत्र येतात. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेले मुंबई – नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण, घोडबंदर, कशेळी- भिवंडी मार्ग, शिळ फाटा, ठाणे बेलापूर मार्ग यासह काही महत्त्वाचे मार्ग ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून जातात. तसेच अंतर्गत मार्गांवरही शहरात वाहतूक असते. उरण जेएनपीटी येथून गुजरात, भिवंडी आणि नाशिकमध्ये वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही या मार्गांवर असतो. ठाणे जिल्ह्यातील नागरिकरण झपाट्याने वाढत असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे.
आणखी वाचा-ठाणे: ४९९ रुपयांच्या दूधासाठी ३० हजार गमावले
त्यासोबत आता अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे. ठाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर याकालावधीत १ हजार १७ अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये १ हजार १६१ जणांचे अपघात झाले. या अपघातांत २३० जणांना अपघातामध्ये प्राण गमवावा लागला आहे. २०२३ मध्ये याच कालावधीत २०० जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये ९४० गुन्ह्यांची नोंद झाली असून १ हजार ६५ जणांचे अपघात झाले होते. विना शीरस्त्राण दुचाकी चालविणे, वाहन चालविताना होणाऱ्या मानवी चुका, धोकादायकरित्या रस्ता ओलांडणे यामुळे हे अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
२०२४ या कालावधीतील प्राणांकित अपघाताच्या प्रमाणाची सरासरी केल्यास प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे दिसून येते. तसेच दररोज तीन जणांचे गंभीर, किरकोळ स्वरुपाचे अपघात होत आहेत.
विना शीरस्त्राण दुचाकी चालविणे, वाहन चालविताना होणाऱ्या मानवी चुका, धोकादायकरित्या रस्ता ओलांडणे यामुळे अपघात होतात. -पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतुक शाखा, ठाणे पोलीस.
अपघात
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर – २०२३ अपघात
- मृत्यू – २००
- गंभीर जखमी – ५९८
- किरकोळ जखमी – २६७
- एकूण – १०६५
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर – २०२४ अपघात
- मृत्यू – २३०
- गंभीर जखमी – ६०८
- किरकोळ जखमी – ३२३
- एकूण – ११६१