डोंबिवली – आईने मोबाईल हाताळण्यास दिला नाही म्हणून राग अनावर झालेल्या डोंबिवलीतील देसलेपाडा भागातील लोढा हेरिटेज भागातील एका १९ वर्षाच्या तरूणीने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने लोढा हेरिटज परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संजना हेमांगी झोरे असे मयत तरुणीचे नाव आहे. आई हेमांंगी झोरे यांनी यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे. आई हेमांगी आणि मयत मुलगी हे कुटुंब देसलेपाडा येथील लोढा हेरिटेजमधील एका गृहसंकुलात राहते. मयत मुलीची आई हेमांगी या नोकरी करतात. मयत मुलगी शिक्षण घेत होती. तिने मोबाईलवर वेळ घालविण्यापेक्षा अभ्यास करावा, असे आईचे मत होते. त्यामुळे आई तिला मोबाईल वापरापासून प्रतिबंध करत होती.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील वर्दळीच्या ठिकाणची उपहारगृहे हटवली

गुरुवारी रात्री आई, मुलगी दोघी घरात होत्या. रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान मयत मुलीने आईकडे मोबाईल हाताळण्यास मागितला. त्यावेळी आईने मोबाईलपेक्षा अभ्यास कर असा सल्ला दिला. तिला मोबाईल देण्यास नकार दिला. याविषयी मयत मुलगी संजना झोरे हिला राग आला. तिने रागाच्या भरात घरातील एका खोलीत पंख्याच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा >>> नाले बंदिस्त करून विकासकामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चपराक; राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या सुनावणी पत्रात महत्वाची निरीक्षणे

आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मुलगी आतून दरवाजा उघडत नव्हती. सोसायटीतील सदस्यांनी धावपळ करून खोलीत पाहिले तर संजनाने गळफास घेतला होता. मानपाडा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. मुलीला तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या मृत्युविषयी कोणावरही संशय नसल्याचे मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यातील दाखल नोंदीत म्हटले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.