Badlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील नामांकित शिक्षण संस्थेत काही महिन्यांपूर्वी चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर बदलापूरमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले. सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपी अक्षय शिंदेला तात्काळ अटक केली. तसेच पोलीस कोठडीत असताना चकमकीत त्याचा मृत्यूही झाला. यानंतर आता पुन्हा एकदा बदलापूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीनेच या गुन्ह्यात आरोपीला मदत केली. पोलिसांनी रिक्षाचालक आरोपी आणि पीडितेच्या मैत्रिणीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
नेमके प्रकरण काय?
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती २१ डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतले आणि त्यानंतर तिघांनी मद्यपान केले.
मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. याप्रकरणी तिने २३ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या १२ तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या.
हे वाचा >> “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
आरोपीला कपाटातून घेतले ताब्यात
पोलीस ज्यावेळेस आरोपीला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने आरोपी बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. तर या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.
पीडित तरुणीचे आजीबरोबर भांडण झाल्यानंतर ती मैत्रिणीकडे बदलापूरला आली होती. या दोघींची अंधेरी स्थानकात ओळख झाली होती, अशी माहिती बालवडकर यांनी दिली. आरोपी दत्ता जाधव याच्यावर आधीही गुन्हे दाखल झालेले असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, असेही ते म्हणाले.
बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतरही राज्याचे गृह खाते सुधारले असे वाटत नाही. कल्याण आणि बदलापूरमध्ये आता नव्याने घडलेल्या घटनानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या घटनेनंतर केली आहे.