प्राचीन काळापासून बंदर म्हणून प्रचलित असणाऱ्या कल्याणप्रमाणेच आजूबाजूच्या परिसराचा इतिहासही तितकाच प्राचीन आहे. अंबरनाथचे शिलाहारकालीन शिवमंदिर या प्राचीन परंपरेची एक प्रमुख खूण आहे. शेजारच्या कुळगावातही थेट पेशवेकाळापासून संदर्भ सापडतात. इनामदारवाडा त्यापैकीच एक. आधुनिक युगात अवघ्या दोन दशकांत इमारती खिळखिळ्या होतात, तिथे इनामदार वाडा गेली १९० वर्षे उन्हाळे-पावसाळे झेलत उभा आहे..
‘बैठे कौलारू घर’, ‘पुढच्या अन् मागच्या बाजूला भव्य अंगण’, ‘नारळाची उंचच उंच झाडे’ असे हे कोणालाही मोहून टाकणारे वर्णन वाचल्याबरोबरच आपल्या डोळ्यासमोर प्रथम कोकण येते आणि त्यापाठोपाठ कोकणातील एखादा वाडा किंवा जुने घर उभे राहते. कोकणातील वास्तू या कोकणाला लाभलेल्या असंख्य देणग्यांपैकी एक आहेत. कोकणातील या वास्तूंचे जुळे भावंड कल्याणपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुळगाव-बदलापूर या ठिकाणी आजही पाहायला मिळते. कुळगाव-बदलापूर या ठिकाणी असणारा पेशवेकालीन ‘इनाम’दार वाडा कोकणातील वास्तूची प्रचीती देऊन जातो.
बदलापूर रेल्वे स्थानकातून बदलापूर पूर्व दिशेस प्रस्थान केल्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांत आपण गांधी चौक परिसरात पोहोचतो. गांधी चौकातून थोडे पुढे आल्यानंतर आपली नजर ‘इनामदार’ वाडय़ाकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. वाडय़ाचे फाटक उघडताच प्रथमदर्शनी वाडय़ापुढील अंगण आपल्या नजरेस पडते. वाडय़ाला लाभलेले हे भव्य अंगण पाहूनच वाडय़ाचा आवाका किती असेल, याचा अंदाज आपण मनाशी आपण बांधू लागतो. वाडय़ाचा मुख्य दरवाजा कमी उंचीचा असल्याने काळजीपूर्वकरीत्या मान खाली झुकवून वाडय़ात आपल्याला प्रवेश करावा लागतो. वाडय़ात प्रवेश केल्यानंतर प्रथम पडवीचा भाग लागतो. पडवीतून ओटीकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा वापर करावा लागतो. वाडय़ातील ओटीचा भागही प्रशस्त आहे. ओटीच्या या भागातील कोनाडे, खुंटय़ा, भिंतीतील कपाटे आदी गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात. ओटीच्याच भागात एक छोटी खोली बंद स्वरूपात असल्याचे आपल्या निदर्शनास येते. ही खोली म्हणजेच ‘बाळंतिणीची खोली’. पूर्वीच्या काळात बाळंतीण बायकांच्या वापरासाठी या खोलीचा वापर केला जाई. परंतु आज ही खोली बंद स्वरूपातच पाहायला मिळते. ओटीतून आत आल्यानंतर वाडय़ाचे माजघर लागते. वाडय़ाचे माजघर पाहून आपण खरोखरच नि:शब्द होतो. साधारण तीस माणसे जेवायला बसू शकतील, इतके या माजघराचे आकारमान आहे. माजघरात जुन्या पद्धतीची भिंतीतील कपाटे, मोठे देवघर, लाकडी झोपाळा आहेच; परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचे एसी, टी.व्ही., बेडही आहेत. त्यामुळे या ठिकाणी जुन्या आणि नव्या संस्कृतीची उत्तमप्रकारे सांगड घातली गेल्याचे पाहायला मिळते. इनामदार वाडय़ात सर्वत्र भिंतीतील कपाटे पाहावयास मिळतात. माजघरातील भक्कम लाकडी झोपाळा येथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो. अतिशय वजनदार असणारा हा लाकडी झोपाळा उचलायचा झाल्यास किमान दोन माणसांची गरज भासते, असे मोहन जोशी सांगतात. माजघरात प्रशस्त असे देवघर पाहायला मिळते. एरवी आताच्या वनबीएचके, टूबीएचके गृहसंस्कृतीत सहसा देवघर असत नाही. तेवढी जागाच नसते. त्यामुळेच वाडय़ातील देवघर पाहत असताना ब्लॉक सिस्टीममध्ये वाढणाऱ्या प्रत्येकास त्याचे नवल वाटल्यावाचून राहत नाही. माजघर परिसरात वातावरण थंड वाटते. बाहेर कितीही उकाडा असला, तरीही वाडय़ात त्याची झळ जाणवत नाही. वाडय़ाचे लाकडी बांधकाम, रुंद िभती यामुळे हा थंडावा असल्याचे जोशी कुटुंबीय सांगतात. माजघरातील एका कोपऱ्यात एक दरवाजा आपल्याला दिसतो. या दरवाजाचा वापर पूर्वीच्या काळी स्त्रिया वाडय़ात ये-जा करण्यासाठी करीत असत. इनामदार वाडा हा दुपाखी आहे. माजघरातून वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दोन जिने आहेत; परंतु त्यापैकी एकच जिना आज वापरात आहे. माजघरातून पुढे आल्यानंतर स्वयंपाकघर आणि त्या बाजूला आणखीन एक खोली आपल्याला पाहायला मिळते. त्यापलीकडे वाडय़ाचे मागचे अंगण आहे. या मागच्या अंगणात नारळाचे झाड आणि विहीर आहे. विशेष म्हणजे कल्याण आणि परिसरातील बहुतेक विहिरींचे पाणी आटलेले असताना इनामदार वाडय़ातील विहिरीला मात्र आजही पाणी आहे. या पाण्याचा वापर वाडय़ातील जोशी कुटुंबीय करीत आहेत.
पेशवे यांनी कै. अनंत जोशी यांना कुळगांव या ठिकाणी ‘इनामी’ बहाल केली. किंबहुना म्हणूनच जोशी यांचा हा वाडा आजही ‘इनामदार वाडा’ म्हणून ओळखला जातो. १९० वर्षे जुना असणारा हा वाडा कै. अनंत जोशी यांनी १८२६ मध्ये बांधला. जोशी यांना त्या काळी पेशव्यांकडून पुणे, कल्याण, पनवेलजवळील चिंदरण, कुळगाव अशा विविध शहरांची इनामी बहाल करण्यात आली होती. इनामदार वाडय़ात आजमितीला मोहन जोशी, त्यांची पत्नी भाग्यश्री जोशी, मुलगा महेश जोशी आणि सून श्रिया जोशी वास्तव्यास आहेत. वाडय़ात काळानुसार बदल होत गेले. पूर्वी वाडय़ाला नळीची कौले होती. त्यांची जागा नंतर मंगलोरी कौलांनी घेतली. वाडय़ात पूर्वी झरोक्यांसारख्या खिडक्या होत्या, त्यांची जागा आता आधुनिक पद्धतीच्या मोठय़ा आकाराच्या खिडक्यांनी घेतली. वाडय़ातील शेणाने सारवलेल्या जमिनी आज फरशांनी सजलेल्या आहेत. १९६२-६३ मध्ये बदलापूर गावात वीज आली. त्यापूर्वी वापरण्यात येणाऱ्या चिमण्या, हंडय़ा, कंदील मात्र वाडय़ातील एका कोपऱ्यात पडून इतिहासाची आठवण करून देताना दिसत आहेत. वाडय़ात काळानुरूप बदल झाले असले तरीही वाडय़ाचे मूळ वैभव, संपन्नता, माणसांचे एकमेकांशी असणारे ऋणानुबंध आजही कायम आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा