ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कापूरबावडी ते गायमुखपर्यंतचा मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी तसेच बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग या दोन प्रकल्पांच्या कामात २,७६८ वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी १,९५६ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे, तर ८१२ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या कामासाठी पालिकेने ठेकेदार नियुक्त करण्याकरीता निविदा काढली आहे. मात्र, हे पुनर्रोपण कुठे केले जाणार आणि कोणत्या प्रजातीची वृक्ष आहेत, याबाबत महापालिका प्रशासनाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.

घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी घोडबंदर हा एकमेव मार्ग आहे. याच मार्गावरून येथील नोकरदार मुंबई, वसई, ठाणे, भिवंडीच्या दिशेने प्रवास करतो. शिवाय, या मार्गावरून गुजरात आणि जेएनपीटी बंदराच्या दिशेने दररोज मोठ्या संख्येने अवजड वाहतूक सुरू असते. या वाहतुकीमुळे प्रचंड कोंडी होत असतानाच, या ठिकाणी मेट्रो मार्गिका उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे घोडबंदर मार्ग अरुंद होऊन कोंडीत आणखी वाढ झाली आहे.

कोंडीची ही समस्या सोडविण्यासाठी घोडबंदरचा मुख्य मार्ग आणि त्यालगतचे सेवा रस्ते जोडून प्रत्येकी चार-चार अशा एकूण आठ मार्गिकांचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काही महिन्यांपूर्वी घेतला आहे. त्याचे कामही प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामामध्ये मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या मध्यभागी असलेली तब्बल २ हजार १९६ वृक्षे बाधित होणार आहेत. त्यापैकी केवळ ५४९ वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे. उर्वरित १ हजार ६४७ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला दिला होता. त्यास पालिकेने मान्यता देऊन या कामासाठी निविदाही काढली आहे.

अदानींच्या आणखी एका प्रकल्पाला हिरवा कंदील

मुंबई : रायगड जिल्ह्यातील अंबा नदीकाठी प्रस्तावित असलेल्या जेट्टी प्रकल्पासाठी १५८ कांदळवने तोडण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी ‘अदानी सिमेंटेशन लिमिटेड’ला परवानगी दिली. तथापि, प्रकल्पासाठी कांदळवने तोडण्याची परवानगी देताना न्यायालयाने विकास आणि पर्यावरण संवर्धनाचे संतुलन राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले व प्रकल्पासाठी विविध प्राधिकरणांनी लादलेल्या अटींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश कंपनीला दिले. अंदाजे १७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मालवाहतुकीला जलवाहतुकीकडे वळवून रस्त्यावरील गर्दी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

खाडीकिनारी मार्गातही वृक्षतोड

वाहतूक कोंडीग्रस्त घोडबंदर रस्त्याला पर्यायी असा ठाणे खाडीकिनारी मार्ग उभारण्यात येणार आहे. खारेगाव ते गायमुख असा १३.४५ किमी लांबीचा खाडीकिनारी मार्ग उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची उभारणी एमएमआरडीएमार्फत करण्यात येणार आहे. या मार्गाच्या कामातही ५७२ वृक्ष बाधित होणार आहेत. यापैकी ३०९ वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे तर, २६३ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या प्रस्तावालाही ठाणे पालिकेने मान्यता दिली असून या कामासाठी पालिकेने निविदा काढली आहे.

दोन्ही प्रकल्पांत बाधित ठरणारे वृक्ष तोडणे आणि काही वृक्षांचे पुनर्रोपण करणे अशी कामे केली जाणार आहेत. या कामांचा खर्च ‘एमएमआरडीए’मार्फत केला जाणार आहे. तसेच वृक्षांचे पुनर्रोपण हे परिसरातच केले जाणार आहे. मधुकर बोडकेउपायुक्त, ठाणे महापालिका

Story img Loader