दिवसा वाळू उपसा केल्यास महसूल, पोलिस कर्मचारी त्रास देतात म्हणून वाळूमाफियांनी रात्रभर डोंबिवली, भिवंडी जवळील खाडी भागात वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे. वाळू उपसा बोटीन वरील कारवाई टाळण्यासाठी दिवसा वाळू उपसा बोटी मुंब्रा पूर्व भागातील एका खाचरात सुरक्षित राहतील अशी व्यवस्था माफियांनी करून ठेवली आहे.
मुंब्रा पूर्व रेल्वेमार्ग जवळील खारफुटीचे जंगल असलेल्या आणि खाडी भागात खाचरात आडोशाला एकावेळी पंधरा ते वीस बोटी महसूल, पोलिस अधिकाऱ्यांना दिसणार नाहीत अशा पद्धतीने उभ्या करण्यात येत आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दिवसा वाळू उपसा करताना महसूल, पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर लाखो रुपयांचे नुकसान होते. अशाप्रकारे वाळूमाफियांचे कोट्यवधी सामग्रीचे नुकसान यापूर्वी ठाणे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी, डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. त्यानंतर मागील चार ते पाच वर्ष वाळू माफिया गायब होते.
दोन वर्षापासून वाळू माफियांनी पुन्हा मुंब्रा, डोंबिवली, कोपर, डोंबिवली गणेशनगर, देवीचा पाडा, भिवंडी जवळील पिंपळास, मानकोली, दिवे अंजूर भागात वाळू उपसाचा धंदा जोमाने सुरू केला आहे. दिवसा कारवाई होते म्हणून बाळू माफिया रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत खाडीत उपसा करून महसूल अधिकाऱ्यांना काही कळू नये म्हणून मुंब्रा खाडीतील खाचरात असलेल्या जागी असरा घेत असल्याची माहिती पुढे आली आहे.
डोंबिवली परिसरात रात्री वाळू उपसा केल्यानंतर या बोटी मुंब्रा पश्चिम खाडी भागातून मुंब्रा पूर्व भागात रेल्वे मार्गावरील पुलाखालून जातात. त्यावेळी खाडी जवळील गस्ती पोलिसांना या बोटी दिसत नाहीत का, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत. उपसा केलेली वाळू डंपरने शहराच्या विविध भागात डंपरने पोहोचवली जाते. काही साठा खाडीकिनारीच्या हौदात किंवा खारफुटीच्या आडोशाला लपवून ठेवला जातो. तलाठी, मंडल अधिकारी हा सगळा प्रकार पाहत असतात. परंतु माफियांकडून हल्ला होण्याची भीती असल्याने ते जीव धोक्यात घालून कारवाई करण्यास पुढे येत नसल्याचे समजते. चोरट्या वाळूची वाहतूक करणारे डंपर पहाटेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस शहराच्या विविध नाक्यांवर, पूलांवर घडवून आपला कार्यभाग साधून घेतात, अशाही तक्रारी आहेत. अधिक माहितीसाठी वाळू विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना यासंदर्भातची माहिती दिली तरी ते कारवाई करतो एवढेच साचेबद्ध उत्तर देतात असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.